भक्तशिरोमणी संकटमोचन हनुमानाची विविध गुणवैशिष्ट्ये !
१. जितेंद्रिय
मारुति हा तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म करणार्या शिवशंकराचा अंशावतार आहे. त्यामुळे त्याने कामवासनेसह षड्र्रिपूंवर विजय प्राप्त केला आहे. सर्व इंद्रियांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याचे सामर्थ्य हनुमंतामध्ये असल्याने त्याला ‘जितेंद्रिय’ म्हणून गौरवांकित केले आहे.
२. वज्रांग बजरंग बली
हनुमंताचा देह वज्रासारखा कठोर आहे. त्यामुळे शत्रूने सोडलेली दिव्यास्त्रे त्याच्या देहाला भेदू शकत नाहीत. त्रेतायुगात रावण सैन्याने वानरसैन्य आणि द्वापरयुगात महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी कौरवांनी पांडव यांवर सोडलेली दिव्यास्त्रे हनुमानाच्या कृपेमुळे विफल झाली. त्रेता आणि द्वापर युगातील युद्धांमध्ये शत्रूकडून अगणित शस्त्रास्त्रांचा आघात होऊनही वज्रांग हनुमंताचे काहीच अहित झाले नाही.
३. महावीर आणि महाशक्तीशाली
सीतेचा शोध घेण्यासाठी लघुरूप घेतलेला हनुमान जेव्हा लंका नगरीत प्रवेश करू लागला, तेव्हा लंकेचे रक्षण करणार्या लंकिणी नावाच्या राक्षसिणीने त्याला प्रवेशद्वारावर अडवले. हनुमान इतका बलशाली होता की, त्याने क्षणात विराट रूप धारण केले आणि लंकिणीच्या मस्तकावर जोरात मुष्टीप्रहार केला. एका मुष्टीप्रहारात लंकिणीची दुर्दशा झाली आणि ती हनुमानाला शरण आली.
४. युद्धकुशल आणि द्विव्यास्त्रांचा जाणकार
हनुमंताने वीररूप धारण करून सूरसा राक्षसी, अक्षकुमार, जंबुमाळी, देवांतक, नरांतक, त्रिशिरा, अहिरावण, महिरावण, मायासूर इत्यादी राक्षसांशी युद्ध करून त्यांना ठार मारले. त्याला दिव्यास्त्रांचे ज्ञान होते.
५. नेतृत्वगुणांनी संपन्न असणारा हनुमान
हनुमंताने अनेक प्रसंगी उत्तम नेतृत्व केले. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
५ अ. १०० योजन (४०० कि.मी.) समुद्र एका दमात ओलांडून शत्रूच्या नगरीत प्रवेश करून सीतामातेचा शोध घेण्याचे दायित्व पूर्ण करणे : हनुमान, अंगद, जांबुवंत आणि वानरसेना सीताशोधार्थ दक्षिण दिशेकडे गेले असता संपातीने त्यांना सीतामाता समुद्रातील लंकेच्या बेटावर बंदिस्त असल्याचे सांगितले. ‘१०० योजन समुद्र उल्लंघून लंकेला कोण जाणार ?’, हा प्रश्न सर्व वानरांपुढे होता. तेव्हा हनुमंताने १०० योजन (४०० कि.मी.) समुद्र एका दमात ओलांडून शत्रूच्या नगरीत प्रवेश करून सीतामातेचा शोध घेण्याचे दायित्व स्वीकारले आणि पूर्ण केले.
५ आ. संकटात गांगरून न जाता धैर्याने उपाय शोधणारा हनुमान ! : लंकेतील युद्धाच्या वेळी जेव्हा इंद्रजिताने राम आणि लक्ष्मण यांच्यावर नागपाश सोडून त्यांना नागपाशात जखडून ठेवले, तेव्हा वानर सेनेत हाहाःकार माजला. त्या वेळी हनुमंत शून्य गतीने (अतिशय वेगाने भ्रमण करणे. देवता भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या लोकातून पृथ्वीवर येतांना शून्य गतीने येतात. याला ‘र्हंस’ गती असेही म्हणतात. अवतार महार्हंस गतीने भ्रमण करतात.) वैकुंठात गेला आणि गरुडाला घेऊन पृथ्वीवर आला. गरुडाने राम आणि लक्ष्मण यांची नागपाशातून त्वरित मुक्तता केली.
६. राजनीतीज्ञ आणि कूटनीतीज्ञ हनुमान
६ अ. सुग्रीवाचा चतुर आणि नीतीवान महामंत्री : हनुमान किश्किंधानरेश सुग्रीवाचा महामंत्री होता. सुग्रीव राज्यकारभार उत्तमरित्या चालवण्यासाठी जांबुवंतासह हनुमंताचाही सल्ला आवर्जून विचारात घेत असे. महामंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असतांना हनुमानाने मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांशी सलोख्याचे नाते जोपासून राजाचेही मन जिंकले होते. राजाने धर्माधिष्ठित राज्यकारभार चालवण्यासाठी कर्तव्ये आणि राजधर्म यांचे कशा प्रकारे पालन करायला हवे, याविषयी हनुमानाने सुग्रीवाला मार्गदर्शन केले होते.
६ आ. श्रीरामाचा दूत बनून कार्य करणे : सीतेचा शोध घेतांना जेव्हा हनुमान लंकेत पोचला, तेव्हा इंद्रजिताने ब्रह्मास्त्रात बांधलेल्या हनुमंताला रावणापुढे आणले. हनुमानाने केवळ बंदिवान म्हणून भूमिका पूर्ण न करता श्रीरामाचा दूत म्हणून रावणाशी संभाषण केले. या संभाषणात त्याने श्रीरामाचे श्रेष्ठत्व सांगून त्याची महती गायली आणि श्रीरामाच्या वतीने रावणाला सीतामातेला मुक्त करण्याचा आदेश दिला. हनुमानाने दूत म्हणून कार्य करत असतांना शत्रूच्या मनोधैर्याचे कशा प्रकारे खच्चीकरण करायचे आणि त्यास शरण येण्यास कसे उद्युक्त करायचेे, हे शिकवले. रामदूत म्हणून भूमिका पार पाडत असतांना हनुमंताने राजनीती आणि कूटनीती यांचा सुरेख उपयोग केला. यावरून हनुमानाच्या चातुर्याचा परिचय मिळतो.
७. भक्तवत्सल हनुमान
हनुमान भक्तवत्सल आहे, याची ग्वाही पुढील उदाहरणांतून मिळते.
७ अ. सुग्रीव पत्नी रूमेचे संरक्षण करणे : सुग्रीवाची पत्नी रूमा ही वालीच्या बंदिवासात असतांना तिच्यावर अतीप्रसंग करण्यासाठी वाली येत असे, तेव्हा रूमा हनुमानाचे स्मरण करत असे. रूमेने स्मरण करताच हनुमंत प्रगट होत असे आणि तिचे वालीपासून संरक्षण करत असे.
७ आ. सुग्रीवाची प्रभु श्रीरामाशी भेट करून देणे : ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी सुग्रीवाचा शोध घेत आलेले प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांची ओळख राजपुरोहिताच्या रूपातील हनुमानाला पटल्यावर तो दोघांना घेऊन सुग्रीवाकडे आला. हनुमानामुळे सुग्रीवाची प्रभु श्रीरामाशी भेट झाली.
७ इ. हनुमानाने इंद्राची सुटका करणे : हनुमान जेव्हा सीताशोधार्थ लंकेला गेला होता, तेव्हा त्याने ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून इंद्रजिताने बंदीवान केलेल्या इंद्राची सुटका केली.
७ ई. हनुमानाने रावणाच्या बंदिवासातून नवग्रहांना मुक्त करणे : रावणाला चेतावणी देण्यासाठी लंकेत आलेल्या नवग्रहांना रावणाने त्याच्या मायावी सिद्धीच्या साहाय्याने बंदीवान केले. नवग्रहांनी मुक्तीसाठी ब्रह्मदेवाला प्रार्थना केल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून हनुमानाने नवग्रहांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त केले.
७ उ. अंतर्यामी हनुमंताने बिभीषणाच्या मनातील रामभक्ती ओळखून त्याला आश्रय देण्याचा सल्ला प्रभु श्रीरामाला देणे : लंकेला पोचण्यापूर्वी जेव्हा वानरसैन्य दक्षिण भारताच्या समुद्रतटावर होते, तेव्हा रावणाचा लहान भाऊ बिभीषण प्रभु श्रीरामाला शरण आला. ‘बिभीषणाला आश्रय द्यावा कि न द्यावा ?’, या दुविधेत प्रभु श्रीराम असतांना अंगद, सुग्रीव, लक्ष्मण आणि जाबुवंत यांनी बिभीषणाविषयी अविश्वास दाखवून त्याला आश्रय न देण्याचे मत व्यक्त केले. अंतर्यामी हनुमंताने बिभीषणाच्या मनातील रामभक्ती ओळखून त्याला आश्रय देण्याचा सल्ला प्रभु श्रीरामाला दिला. हनुमंतामुळे प्रभु श्रीरामाने बिभीषणाला स्वीकारले.
७ ऊ. लक्ष्मणाला संजीवनीरूपी पुनर्जीवन देणे ! : हनुमंताने द्रोणागिरी पर्वत आणून वैद्य सुश्रेनला लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी संजीवनी उपलब्ध करून दिली. संजीवनीचा औषधोपचार वेळेत मिळाल्यामुळे लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण झाले. त्यामुळे लक्ष्मणाला संजीवनीरूपी पुनर्जीवन देण्याचे श्रेय हनुमंताला जाते.
७ ए. हनुमानाने मुक्तासुराशी युद्ध करून अप्सरांना मुक्त करणे : त्रेतायुगात राम-रावण युद्धानंतर पाताळातील मोठा असुर मुक्तासुराने स्वर्गातील अप्सरांना समुद्रामध्ये नेऊन त्यांना मोत्यांच्या साखळीने जखडून ठेवले. नारदमुनींच्या सांगण्यावरून हनुमान समुद्रात गेला आणि त्याने मुक्तासुराशी युद्ध करून त्याला नष्ट केले अन् अप्सरांना मुक्त केले.
७ ऐ. हनुमंताच्या कृपेमुळे बिभीषण आणि सरमा यांचे आसुरी आक्रमणांपासून रक्षण होणे : प्रभु श्रीरामाने देहत्याग केल्यानंतर पुन्हा असुर बलवान होऊ लागले. प्रचंडासुर, विकटासुर आदी असुरांनी बिभीषण आणि त्याची धर्मपत्नी सरमा यांवर आक्रमणे करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला; परंतु महाबली हनुमंताच्या कृपेमुळे बिभीषण आणि सरमा यांचे असुरांपासून रक्षण झाले.
७ ओ. लव आणि कुश यांचा रक्षणकर्ता हनुमान ! : प्रभु श्रीरामाने देहत्याग केल्यानंतर लव आणि कुश यांनी राज्यकारभार सांभाळला. हनुमानाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून साहाय्य केले. त्याचप्रमाणे प्रचंडासुर, विकटासुर आदी राक्षसांनी त्यांच्यावर केलेल्या आक्रमणांपासून हनुमंताने त्यांचे रक्षण केले. एकदा लव आणि कुश यांच्यावर राहु अन् शनि यांची अवकृपा होऊन ते एका जीवघेण्या संकटात सापडले. हनुमानाच्या कृपेमुळे त्यांचे संकटनिवारण झाले आणि ते सुखरूपपणे निजधामी पोचले.
८. लेशमात्र अहंकार नसणारा आणि सर्वगुणसंपन्न असणारा महाबली हनुमान !
८ अ. देव असूनही भक्त बनून रहाणे : हनुमान स्वत: उच्च देवता असूनही देवपण न स्वीकारता श्रीरामाची भक्ती करून स्वत:ला ‘रामदास’ म्हणवून घेण्यात गौरव अनुभवतो. तो देव असूनही भक्त बनून वावरतो.
८ आ. केसरी आणि अंजनी यांचा सुपुत्र असूनही राजपुत्राप्रमाणे न मिरवता श्रीरामाचा दास म्हणून वावरणारा निराभिमानी हनुमान ! : सुमेरू राज्याचा राजा केसरी आणि त्याची धर्मपत्नी अंजनी या दांपत्याचा पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्याला जन्मत:च राजवैभवाचे सुख प्राप्त झाले होते; परंतु तो सुमेरू राज्याचा युवराज म्हणून न मिरवता सदैव स्वत:ला ‘श्रीरामाचा दास’ म्हणवून घेत असे आणि श्रीरामाची सेवा करण्यास सतत तत्पर होता. हनुमान राजपुत्र असूनही विनयशील होता.
८ इ. रुद्रावतार, पवनसुत आणि केशरीनंदन असूनही रावणाला स्वत:ची ओळख सांगतांना ‘प्रभु श्रीरामाचा एक दास’, अशी सांगणारा विनयशील हनुमान ! : जेव्हा इंद्रजिताने हनुमानाला बंदी बनवून राजदरबारात रावणापुढे उभे केले, तेव्हा ‘‘तू कोण आहेस ? तुझा परिचय सांग !’’, असे रावणाने हनुमानाला विचारले. हनुमान हा ११ वा रुद्र, सूर्यनारायणाचा शिष्य, वायूपुत्र, वानरराज केसरीचा सुपुत्र, सुमेरू राज्याचा युवराज, सुग्रीवाचा मंत्री आणि प्रभु श्रीरामाचा परम भक्त होता; परंतु त्याने स्वत:चा वरील कोणताच परिचय सांगितला नाही, तर केवळ ‘त्रिलोकपती प्रभु श्रीरामचंद्रांचा एक दास आणि सेवक हनुमान आहे, जो रावणाकडे श्रीरामप्रभूंचा दूत बनून आलेला आहे’, अशी स्वत:ची ओळख सांगितली. यावरून हनुमंताच्या हृदयातील प्रभु श्रीरामाप्रतीचा निस्सीम भाव दिसून येेतो.
८ ई. भगवंताने निरहंकारी हनुमानाच्या माध्यमातून अनेकांचे गर्वहरण करणे !
हनुमंत भगवंताचा परम भक्त होता; त्यामुळे त्याच्यामध्ये लेशमात्रही अहंकार नव्हता. हनुमंतासारख्या अहंशून्य भक्ताच्या माध्यमातून, भगवंताने श्रीरामावतारात रावण, इंद्रजीत, अहिरावण, महिरावण इत्यादी मोठ्या असुरांचे गर्वहरण केले होते. कृष्णावतारात भगवंताने हनुमानाच्या माध्यमातून विष्णुवाहन गरुड, सुदर्शनचक्र, तसेच बलराम, भीम, अर्जुन आदी भक्तांचा सूक्ष्म अहंकार नष्ट केला.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(५.४.२०१५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |