नव्या स्ट्रेनविरुद्ध दोन्ही लसी कार्यक्षम असल्याचा शास्त्रज्ञांचा विश्वास !
पुणे – कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी प्रभावी ठरत असल्याचा विश्वास देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. याचसमवेत मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रींसह लसीकरण हे कोरोना विरुद्ध लढण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि जैव तंत्रज्ञान विभाग यांच्या वतीने ‘सार्स कोविड २ विषाणूची जनुकीय शृंखला’ या विषयावर ‘वेबिनार’चे आयोजन केले होते.
नव्या विषाणूच्या प्रसारामुळे आर्.टी.पी.सी.आर् चाचणीचा अहवाल चुकीचा येत असल्याची सध्या चर्चा आहे; मात्र ही चाचणी पूर्णतः अचूक असून चाचणी चुकीची येण्यामागे नमुना घेतांना होणारी चूक, रुग्णाने चाचणीसाठी केलेला विलंब किंवा इतर मानवी चुका असू शकतात, असे स्पष्टीकरण डॉ. अब्राहम यांनी दिले. पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांनी सर्वांत प्रथम बी.१.६१७ हा भारतीय म्युटंट शोधला होता. त्या आधारे जनुकीय शृंखलेची पुष्टी करण्यात आल्याची माहिती डॉ. अब्राहम यांनी दिली.