देव तारी.. !
भारताची स्थिती प्रतिदिन वाईट होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. अनेक राज्यांनी दळणवळण बंदी केलेली असतांना रुग्णांची संख्या अल्प होण्याचे नाव घेत नाही. यामुळे राज्यांवर प्रचंड दबाव आणि ताण निर्माण झाला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून राज्यांना हवे तसे साहाय्य मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा केंद्राकडून पुरवठा होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे जनतेमध्ये सरकारी यंत्रणांविषयी प्रचंड संताप आहे. लोक यासाठी चोर्याही करण्यास सिद्ध झाले आहेत, असे प्रसंग घडत आहेत. रुग्णालयांकडे खाटा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा रुग्णालयाबाहेरच मृत्यू होत आहे. अशी एकूणच दारूण स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तज्ञांच्या मते १५ मेपर्यंत देशात कोरोनाचे पीक येणार आहे. प्रतिदिन ५ सहस्र लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. हे पहाता ‘आता देवच भारताला आणि भारतियांना या स्थितीत वाचवू शकतो’, असेच म्हणावे लागेल; मात्र ‘देवाने आपल्याला वाचवावे’, असे कुणाला वाटत असेल, तर ‘देवासाठी आपण काय केले ?’, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
देव केवळ त्याच्या भक्तांना वाचवतो. ‘आपण भक्त आहोत का ?’ याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तसे नसेल, तर देव धावून येणार नाही, हे लक्षात ठेवावे लागले. त्यातही देशातील देवस्थाने कोरोनाबाधितांना साहाय्य करण्यास पुढाकार घेत आहेत, असे दिसत आहे. गजानन महाराज संस्थान, शिर्डी संस्थान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, तुळजाभवानी मंदिर समिती आदींकडून रुग्णांसाठी कोविड सेंटर उभे करण्यात आले आहेत. शे-पाचशे खाटा त्यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. मागील लाटेच्या वेळीही मंदिरांनी अशा प्रकारचे साहाय्य केले होते; मात्र आताच्या स्थितीत हे साहाय्य तसे पहाता अपुरेच म्हणावे लागेल. असे साहाय्य देशातील चर्च आणि मशिदी, मदरसे यांच्याकडून विशेष होतांना दिसत नाही. काही मुसलमान साहाय्य करत आहेत, अशी काही उदाहरणे समोर आली आहेत; मात्र चर्चकडून साहाय्य होत असल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रातील आणि देशातीलही लाखो मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे. तसे नसते, तर अशा मंदिरांनी याहून अधिक साहाय्य या काळात केले असते. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पैसे सरकारकडे जातात आणि सरकार अन्य योजनांसाठी ते व्यय करते. मुळात सरकारला धर्माचा पैसा घेण्याचा अधिकार नाही. हा पैसा केवळ धर्मासाठीच व्यय करणे आवश्यक आहे. तरीही ढोंगी धर्मनिरेपक्षतेच्या नावाखाली आणि तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूंमुळे मंदिरांचे सरकारीकरण होते आणि हा पैसा सरकारजमा होतो. मंदिरे भक्तांच्या कह्यात राहिली, तर हा पैसा हिंदूंना साधना शिकवण्यासाठी व्यय करता येईल. हिंदूंना धर्मशिक्षण देता येईल, त्यातून हिंदू धर्माचरणी होतील. त्यांच्यात नैतिकता निर्माण होईल. तसेच हिंदूंनी साधना केली, तर समाजाची सात्त्विकचा वाढून येणारी संकटे देव थोपवू शकतो किंवा येऊच देणार नाही. हा अभ्यास आताच्या राजकारण्यांनी केलेला नाही; कारण त्यांना धर्मशिक्षण नाही. राजकारणामुळे त्यांची मती स्वार्थी, सत्तालोलुप झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात अशा प्रकारचे विचार येणे शक्यच नाही. कुणी त्यांना याविषयी सांगितले, तरी त्यांची ऐकण्याची स्थिती नाही. आम्ही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आहोत, अशी चढाओढ त्यांच्यात असल्याने ते कधीही धर्माचरण, धर्मशिक्षण, साधना या गोष्टी स्वीकारूच शकणार नाहीत. त्यामुळेच देशाची अधोगती होत आहे.
ढोंगी पुरो(अधो)गामित्व सोडा !
तरीही आताच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी भगवान भरोसे रहाण्याचीच आवश्यकता आहे; मात्र देवाला साद घालावी असे कुणालाही वाटत नाही. पूर्वी किंवा आताच्या काळात अनेक गावांमध्ये गावावर संकट आल्यावर देवाला साकडे घालण्याची पद्धत आहे. एरव्ही भारतीय क्रिकेट संघ जिंकावा, ट्रम्प यांचा निवडणुकीत विजय व्हावा, एखाद्या अभिनेत्याची प्रकृती चांगली व्हावी आदींसाठी सवंग लोकप्रियतेसाठी होमहवन करणारे भारतीय ‘कोरोनाचे संकट जाऊदे’ म्हणून प्रार्थना किंवा काही विधी करतांना दिसत नाहीत. काही कर्महिंदू अशा प्रकारे कृती करत आहेत; मात्र त्यांची संख्या अल्प आहे. भारतियांना अशा काळात सामूहिक नामजप, प्रार्थना, मंत्रपठण आदी धार्मिक कृती करून देवाला आळवण्याची आवश्यकता आहे. अशाने देवाची कृपा होऊन हे संकट दूर होऊ शकते; मात्र ‘आम्ही २१ व्या शतकातील नागरिक आहोत. आधुनिक विचारांचे, विज्ञानकाळात वावरणारे आहोत’, अशा मानसिकतेमुळे अशी कृती होण्याची शक्यता नाही. तरीही जे धार्मिक आणि श्रद्धावान आहेत, त्यांनी तरी प्रयत्न केले पाहिजेत. अनेक संत-महंत, शंकराचार्य हिंदूंना फार पूर्वीपासून साधना करण्याचे आवाहन करत आहेत; मात्र बहुतांश हिंदु समाज त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. हे ईश्वराचे वचन आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
देवाला शरण जा !
भारतात १०० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला. त्या वेळचे नागरिक आताच्या तुलनेत अधिक श्रद्धावान होते. त्या तुलनेत आताची स्थिती तितकी गंभीर नाही, असे म्हणता येऊ शकते. त्या वेळी आतासारखी औषधे, प्राणवायू नव्हते, हे नाकारता येणार नाही. त्याच वेळी त्या वेळचे लोक ‘सरकार साहाय्य करेल’, अशा विश्वासावरही नव्हते, हेही मान्य करावे लागेल. ब्रिटिशांकडून कोणतीही अपेक्षा करता येण्यासारखीही स्थिती नव्हती. आताचे सरकार जनतेला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याला अत्यंत मर्यादा असल्याचे दिसत आहे. जन्म आणि मृत्यू हे देवाच्या नियोजनानुसार ठरलेले आहे, तरीही आपले क्रियमाण वापरून आपल्या देहाचे रक्षण करणे आपलेच दायित्व असते. ज्या देवाने हा देह दिला आहे, त्यालाच शरण गेले, तर ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी अनुभूती घेता येते !