अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात ‘कोविड केअर सेंटर’ला प्रारंभ !
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित मैंदर्गी रस्त्यावरील ‘श्री स्वामी समर्थ रुग्णालया’त ‘कोविड केअर सेंटर’ला प्रारंभ करण्यात आला. याचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि खासदार विद्यावाचस्पती जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडले.
या वेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, तहसीलदार अंजली मरोड, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष महेश इंगळे यांनी मान्यवरांचा स्वामी प्रसाद शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपली ! – दत्तात्रय भरणे
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने कोरोनाच्या दुसर्या लाटेतही ‘श्री स्वामी समर्थ रुग्णालया’त ‘कोविड केअर सेंटर’ला प्रारंभ केला. याद्वारे समाजसेवेचे व्रत अंगीकारून सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम जोपासली आहे. देवस्थान नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते.
सेवाभावी वृत्तीने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न ! – सचिन कल्याणशेट्टी, आमदार
कोरोना काळात देवस्थानने समाजातील प्रत्येक घटकास सहकारी केले. तसेच रुग्णांसाठी तपासणी आणि उपचारासाठी देवस्थानचे रुग्णालय उपलब्ध करून दिले. शहरातील निराधार, गरीब आणि गरजू नागरिक, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवक आदींसाठी देवस्थानच्या वतीने अन्नदान सेवेच्या माध्यमातून भोजन प्रसाद उपलब्ध करून दिला. मंदिर समितीने या सर्वच कृतींच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने समाजऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.