पुण्यातील उद्योजकाच्या सहकार्याने सिंगापूरमधून ८ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ३ सहस्र ५०० व्हेन्टिलेटर भारतात आणणार !
आरोग्यव्यवस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करणार्या सर्व उद्योजकांचे अभिनंदन ! सद्यस्थितीत सिंगापूर येथून आणलेल्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोचण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पुणे – पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांनी जिल्ह्यामधील आरोग्यव्यवस्था अद्ययावत करण्यासाठी इतर व्यावसायिकांच्या मदतीने मागील वर्षभरात २०० कोटी रुपये उभे केले आहेत. त्यांना सिंगापूरमध्ये आरोग्यासंबंधी साहित्य उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे सिंगापूर सरकारच्या कॉर्पस निधीअंतर्गत सिंगापूर सरकारने मेहता यांना निम्म्या रकमेमध्ये वरील साहित्य देण्याचे सुचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवानगीने एअर इंडियाच्या माध्यमातून सिंगापूर मधून ८ सहस्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ३ सहस्र ५०० व्हेन्टिलेटर भारतात आणले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.