भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी हनुमंताची उपासना करा ! – प.पू. दास महाराज

पानवळ (सिंधुदुर्ग) येथील श्रीराम पंचायतन मंदिरात श्रीरामनवमी साधेपणाने साजरी

श्रीराम पंचायत मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सजवलेल्या मूर्ती

बांदा, २५ एप्रिल (वार्ता.) – सध्या चीनमधून जगभर कोरोना विषाणू पसरला आहे. यामुळे संपूर्ण विश्‍वावर संकट कोसळले आहे. वास्तवात हा पृथ्वीवरील अधर्माच्या विनाशकाळाचा आरंभ आहे. या विषाणूवर सध्या लस मिळाली असली, तरी अजून औषध सापडलेले नाही. अशा विनाशकाळात तरून जाण्यासाठी हिंदु बांधवांनी हनुमंताची उपासना करावी, असे आवाहन पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांनी केले.

सरकारने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात २१ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमी उत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साध्या पद्धतीने पार पडला. याप्रसंगी भाविकांना संदेश देतांना प.पू. दास महाराज बोलत होते. या वेळी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि प.पू. दास महाराजांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक उपस्थित होत्या.

श्रीरामाचा पाळण्याला झोका देतांना प.पू. दास महाराज

या वेळी प.पू. दास महाराज पुढे म्हणाले की,

१. गतवर्षापासून कोरोनासमोर संपूर्ण विश्‍व हतबल झाले आहे. या महारोगाने अनेकांचे प्राण घेतले आहेत. या महारोगामुळे संपूर्ण विश्‍वाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. उद्योग, व्यवसाय बंद पडू लागल्याने अनेकांसमोर संसाराचा गाडा कसा चालवायचा, याची घोर चिंता लागली आहे.

२. ही आपत्काळाची नांदी आहे. या आपत्काळात एका भगवंताशिवाय कुणीही आपल्या साहाय्याला धावून येणार नाही; म्हणून चिंता, काळजी करून मार्ग निघणार नाही. त्याऐवजी संतांच्या सत्संगात रहा. धर्माचरण करा. अंतरात निवास करणार्‍या रामरायांशी अनुसंधान साधा. मारुतिरायांसारखी दास्यभक्ती अंगी बाणवा. मारुतिरायांची उपासना करा. हनुमानचालिसा वाचा. नामस्मरण करा.

३. जसे शनीची साडेसाती लागल्यानंतर आपण हनुमंताची उपासना करतो, तसे आता संपूर्ण विश्‍वावर शनीची वक्रदृष्टी आली आहे. त्यातून वाचण्यासाठी हनुमंताची सेवा करा. तसेच ‘३ वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नम: ।’, त्यानंतर एकवेळ ‘श्रीगुरुदेव दत्त ।’, त्यानंतर पुन्हा ‘३ वेळा श्री दुर्गादेव्यै नम: । आणि नंतर एकवेळ ‘ॐ नम: शिवाय ।’ अशा पद्धतीने एकआड एक जप करा.

४. या संकटातून साधकांचे रक्षण करावे, हीच श्रीराम, हनुमंत, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. भगवान श्रीधरस्वामी महाराज आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी प्रार्थना.’

श्रीरामाच्या पाळण्याला झोका देतांना सद्गुरु सत्यवानदादा

या उत्सवानिमित्त सकाळी मंदिरातील नित्यपूजा, धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी १२ वाजता श्रीरामाची मूर्ती पाळण्यात घालून नंतर आरती करण्यात आली. तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

‘कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन प्रतिवर्षीप्रमाणे उत्सवाला मंदिरात न येता घरूनच श्रीरामरायांचे ध्यान करावे’, असे आवाहन प.पू. दास महाराजांनी रामभक्तांना केले होते. तसेच कीर्तन, भजन, महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम रहित केले होते. त्यामुळे अगदी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.