मुख्याधिकार्यांनी नगरसेवकांना वेळच्या वेळी माहिती दिली, तर धमकावण्याचे प्रकार घडणार नाहीत ! – संदेश निकम, नगरसेवक, वेंगुर्ले
कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना मारहाणीची धमकी दिल्याचे प्रकरण
वेंगुर्ले – जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या मुख्याधिकार्यांनी प्रत्येक नगरसेवकाने सुचवलेली विकासकामे करतांना येणार्या अडचणी सोडवून ती करावीत. मुख्याधिकार्यांनी नगरसेवकांना कामांविषयी वेळच्या वेळी माहिती दिली, तर कुडाळसारखे प्रकार घडणार नाहीत, असे मत वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक संदेश निकम यांनी व्यक्त केले आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना एका नगरसेवकाकडून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकार्यांच्या तक्रारीवरून त्या नगरसेवकाला अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नगरसेवक निकम म्हणाले की, विकासकामे करत असतांना तांत्रिकदृष्ट्या अडचण येत असेल, तर ती अडचण दूर करून काम कसे करता येईल, याचे मार्गदर्शन मुख्याधिकार्यांनी नगरसेवकांना केले पाहिजे; कारण मुख्याधिकारी हे प्रशासनाचे प्रमुख असून सर्व नियम आणि कायदे त्यांना ठाऊक असतात. नगरसेवकांना त्याचे ज्ञान असतेच असे नाही. विकासकामे काही कारणाने होणार नसतील, तर त्याची माहिती नगरसेवकांना दिली पाहिजे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीत घडलेला कथित मारहाणीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही. कुडाळच्या मुख्याधिकार्यांना मारहाण झाली असेल, तर त्याचा मी निषेध करतो.