सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची भाजपचे आमदार नीतेश राणे यांची शासनाकडे मागणी

नीतेश राणे

कणकवली – सध्या कोरोना या साथीच्या आजाराला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी विविध उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वतीने आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना आणि १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना २ टप्प्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता लसीकरणाविषयी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, जिल्ह्याला अधिक प्रमाणात लसीचा पुरवठा करावा अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

आमदार राणे यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या आणि केलेल्या सूचना

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ५६ ठिकाणी आरोग्ययंत्रणेच्या वतीने लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींची संख्या २ लाख ५० सहस्र आहे; मात्र जिल्ह्यात अजूनपर्यंत १ लाख डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात लसीचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद आहे. त्यामुळे १.५० लाख डोस तातडीने मिळणे आवश्यक आहे.

२. १ मेपासून १८ वर्षांंवरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात या १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींची संख्या सुमारे ८ लाख ५० सहस्र आहे. म्हणजे जिल्ह्याला आजपर्यंत प्राप्त झालेले १ लाख डोस वगळता आणखी ७ लाख ५० सहस्र डोसची आवश्यकता भासणार आहे. या वयोगटामध्ये बहुसंख्य तरुण मंडळींचा समावेश असल्याने शासनाकडून पुरेसा साठा उपलब्ध करून न दिल्यास लसीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांसमवेत वादविवाद होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

३. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याकडून लसीचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याला लसींचे १ लाख डोस पुरवण्यात येतात, तेव्हा त्यांच्याकडून केवळ १० सहस्र डोस सिंधुदुर्ग जिल्ह्याला वितरित केले जातात. त्यामुळे सिंधुदुर्गातील लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीने चालू आहे.