गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित २ सहस्र २९३ नवीन रुग्ण
|
पणजी, २५ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा कहर चालूच आहे आणि २५ एप्रिलला आलेल्या आकडेवारीने पूर्वीच सर्व उच्चांक मोडल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात २५ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र २९३ नवीन रुग्ण आढळले आणि २४ कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३ सहस्र ६८९ झाली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १७ झाली आहे. राज्यात २५ एप्रिलला कोरोनाविषयक ५ सहस्र ९४६ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३८.५६ टक्के आहे. २५ एप्रिलला ६५८ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत.
कांदोळी, पर्वरी आणि मडगाव येथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
अधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असलेली काही आरोग्य केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत. मडगाव १ सहस्र २३६, कांदोळी १ सहस्र २०८, पर्वरी १ सहस्र १५७, पणजी ८८३, फोंडा ७७२, कुठ्ठाळी ७७१, म्हापसा ७५३, वास्को ७११, कासावली ४६६, शिवोली ४५१, चिंबल ४३२, सांखळी ४१७, पेडणे ३१०, डिचोली ३०९ आणि धारबांदोडा २२३.
७ रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत निधन
राज्यात २५ एप्रिल या दिवशी २४ कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाले. यामधील ७ रुग्ण दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि १७ रुग्ण गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत होते. विशेष म्हणजे यामधील ७ रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत निधन झाले आणि या सर्व रुग्णांना मागील किमान ३ दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. निधन पावलेल्यांमध्ये २५ वर्षीय युवकाचा समावेश असून या युवकामध्ये गेल्या १० दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेली एक व्यक्ती एका रस्ता अपघातात गंभीर घायाळ झाल्याने रुग्णालयात उपचार घेत होती. या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते; मात्र रुग्णाचे निधन कोणत्या कारणामुळे झाले, याचा उलगडा शवविच्छेदनानंतर होणार आहे.