उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रमाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमात प्रसारित
कोरोना महामारीचे निर्बंध मोडल्याने अनेकांकडून टीका
पणजी – राज्यात कोरोनाचा कहर चालू असतांना कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांना हरताळ फासणारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रमाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमात प्रसारित झाला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे नाचतांना दिसत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावर यांनी मास्क घातलेला आहे; मात्र व्हिडिओत नाच करत असलेल्या अनेकांनी मास्क घातलेेले नाहीत किंवा सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे पालन करण्यात आलेले नाही.
त्याचप्रमाणे राज्यात विवाह समारंभादी कार्यक्रमांना ५० हून अधिक लोक एकत्र येण्यास निर्बंध असतांनाही या व्हिडिओमध्ये ५० हून अधिक लोक एकत्र आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या सत्यतेविषयी विचारले असता उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी हा व्हिडिओ २४ एप्रिल या दिवशीचा असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकरणी आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.