ई-पास नसल्यास गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी;
मात्र महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध नाहीत
पणजी – महाराष्ट्र शासनाने २५ एप्रिल या दिवशी पहाटेपासून महाराष्ट्रात गोवा राज्यातून प्रवेश करण्यासाठी अचानकपणे कडक नियम केले. महाराष्ट्रात प्रवेश मिळवण्यासाठी ई-पास बाळगणे बंधनकारक केले आहे. या ई-पासमध्ये कोणत्या जिल्ह्यात जाणार आणि किती वेळ थांबणार, याविषयी माहिती भरावी लागते. अचानक ई-पास प्रक्रिया चालू केल्याने सीमा भागांतील बांदा, आरोंदा या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची सकाळपासून परवड चालू झाली. ई-पास नसलेल्यांना पोलिसांनी रोखले. पत्रादेवी, न्हयबाग आणि किरणपाणी या तिन्ही नाक्यांवर महाराष्ट्र पोलिसांकडून कडक तपासणी चालू झाली. याचा पत्रादेवी सीमा भागातील बांदा बाजारपेठेवर परिणाम झाला. ई-पास नसल्याने पोरस्कडे येथील रेल्वे पुलावरून काही नागरिकांनी बांदा येथे जाण्याची वाट धरली. गोवा शासनाने मात्र महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.