उडुपी शिरूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून १६ वर्षीय अनिरुद्ध सरलाथैया यांची निवड !
१४ मे या दिवशी पदग्रहण करणार !
उडुपी (कर्नाटक) – धर्मस्थळातील निदले गावात रहाणारे १६ वर्षांचे अनिरुद्ध सरलाथैया यांचा उडुपीच्या ८ मध्व मठांपैकी श्री शिरुर मठाचा ३१ वा वारस म्हणून अभिषेक करण्यात येणार आहे. अनिरुद्ध सरलाथैया यांचा औपचारिक विधी १४ मे या दिवशी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे श्री सोडे मठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. दहावीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेले अनिरुद्ध यांना सकाळी ७.३५ ते ८ या शुभमुहूर्तावर संतपदावर आरूढ केले जाईल. उडुपीतील मठाचे वारस म्हणून किशोर मुलाची नेमणूक करण्याची परंपरा आहे.
निदले गावचे डॉ. उदयकुमार सरलाथैया आणि श्रीविद्या यांचे पुत्र अनिरुद्ध सरलाथैया यांनी श्री सोडे मठाच्या विविध विषयांचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी हे दायित्व स्वीकारण्यास सक्षम असल्याचे सांगितले. श्री लक्ष्मीवर थेरठ यांच्या देहत्यागानंतर २ वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या सिंहासनावर ते विराजमान होतील.
अनिरुद्ध सरलाथैया यांना वाटते की, श्रीकृष्णाची पूजा केल्याने त्यांना समाधान मिळेल आणि म्हणूनच त्यांनी संन्यास मार्ग स्वीकारला.