कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कार व्ययात (खर्चात) लाखो रुपयांचा घोळ !
मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार
सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. मृतांसाठी लागणारे जळण, वाहतूक यामध्ये दुप्पट व्यय दाखवून गत वर्षभरात ३० लाख रुपयांचा घोळ झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्यांना निलंबित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे आणि जितेंद्र वाडेकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर कैलास स्मशानभूमीमध्ये वर्ष २०२० पासून सातारा नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यासाठी लागणारे जळण स्मशानभूमीजवळील वखारवाले राजेंद्र कदम यांना देण्यात आले आहे. कदम हे एका मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी १२ मण लाकूड आणि २०० रुपये वाहतूक व्ययाचे देयक पालिकेला देत आहेत. १ मण लाकडासाठी ३०० रुपये प्रमाणे १२ मण लाकडांसाठी ३ सहस्र ६०० रुपये आणि एका मृतदेहामागे वाहतूक व्यय २०० रुपये असा ३ सहस्र ८०० रुपये एकूण व्यय एका अंत्यसंस्कारासाठी दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात एकाच ट्रॉलीमधून अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे वजन न करताच अग्निकुंडापर्यंत आणून टाकली जात आहेत. त्याचे कोणतेही मोजमाप केले जात नाही. अग्निकुंडापासून वखारीचे अंतर जेमतेम १०० फूट आहे. तरीही एका मृतदेहामागे वाहतूक व्यय २०० रुपये दाखवण्यात आला आहे. अग्निकुंडाची क्षमता एका मृतदेहासाठी ७ मण लाकडाचीच आहे. तसेच लाकूड हे रायवळ जातीचे आहे की, ज्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्य २५० रुपये प्रतिमण आहे. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या व्ययाची तफावत लक्षात घेता वर्षभरात ३० लाख रुपयांचा घोळ घालून अपहार करण्यात आला आहे, हे स्पष्ट होते.
पंतप्रधान निधीतून देण्यात आलेले नवीन ‘व्हेंटिलेटर’ सोलापूर महापालिकेमध्ये धूळ खात पडून !
‘व्हेंटिलेटर’साठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण फिरावे लागत असतांना ‘व्हेंटिलेटर’ विनावापर पडून रहाणे अतिशय गंभीर आहे. असा निष्काळजीपणा करणारे शिक्षेस पात्र आहेत !
सोलापूर – येथे कोरोेनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, तर ‘व्हेंटिलेटर’ नसल्याने प्रसंगी कोरोना रुग्ण दगावत आहेत. अशा स्थितीत नवीन ‘व्हेंटिलेटर’ हाताळण्यासाठी महापालिकेकडे तज्ञ व्यक्ती नसल्याने ते वापराविना अडगळीत धूळ खात पडून आहेत. हे ‘व्हेंटिलेटर’ केंद्र सरकारने पंतप्रधान निधीतून अत्यावश्यक म्हणून महापालिकेस दिले आहेत.
‘व्हेंटिलेटर’ शासकीय रुग्णालयाला दिले असते, तर आतापर्यंत काही जीव वाचले असते ! – किरण देशमुख, भाजप नगरसेवक
महापालिकेकडे ‘व्हेंटिलेटर’ वापरण्यास तज्ञ नसतील, तर आताच्या स्थितीत ‘व्हेंटिलेटर’ शासकीय रुग्णालयास द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना यापूर्वी दिले आहे. हे ‘व्हेंटिलेटर’ शासकीय रुग्णालयाला दिले असते तर आतापर्यंत काही जीव वाचले असते.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे केवळ ४ दिवसांत ५ कर्मचार्यांचा मृत्यू !
सोलापूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ ४ दिवसांत विविध विभागांत काम करणार्या ५ कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही जणांचे वय हे केवळ ३५ ते ४० वर्षांमधील आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |