‘म्युटेशन’मुळे (विकारामुळे) घाबरून जाण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. शशांक जोशी
पंतप्रधानांची ‘महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यासमवेत चर्चा !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ एप्रिल या दिवशी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध भागांत कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांशी चर्चा केली. त्यात ‘महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचाही सहभाग होता. या चर्चेमध्ये डॉ. जोशी यांनी कोरोनाविषयीची सविस्तर माहिती दिल्याविषयी पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. या वेळी डॉ. जोशी यांनी सांगितले, ‘‘लोक घाबरलेले असून त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. ‘म्युटेशन’मुळे (विकारामुळे) घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. विषाणू येत-जात रहातो.’’
Don’t panic, don’t rush after Remdesivir: Doctors say during PM Narendra Modi’s #MannkiBaathttps://t.co/ZsOomW70mT pic.twitter.com/foIbdxLl1o
— Hindustan Times (@htTweets) April 25, 2021
१. ‘महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांना पंतप्रधान म्हणाले, ‘‘तुम्ही सध्या दिवसरात्र काम करत आहात. लोकांना कोरोनाच्या दुसर्या लाटेविषयी काय सांगू शकता ?’’
२. यावर डॉ. शशांक जोशी म्हणाले, ‘‘कोरोनाची दुसरी लाट पुष्कळ वेगाने आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा या वेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. बरे होण्याचा दर अधिक आणि मृत्यूदर अल्प आहे; मात्र या वेळी कोरोनाचा संसर्ग तरुण आणि मुले यांच्यात अधिक दिसून येतो. विषाणू येत-जात रहातो.’’
३. पंतप्रधानांनी त्यांना कोरोनाच्या उपचारांविषयीही प्रश्न विचारले. त्यावर डॉ. जोशी म्हणाले, ‘‘कोरोनाविषयीचे उपचार लोक विलंबाने चालू करतात. आजार अंगावर काढतात. भ्रमणभाषवर येणार्या माहितीवर लोक विश्वास ठेवतात. नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन केले, तर कठीण परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत नाही.’’
४. डॉ. जोशी पुढे म्हणाले, ‘‘कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी हलका, मध्यम आणि तीव्र कोरोना अशा ३ प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. हलक्या स्वरूपातील लक्षणे असलेल्यांनी ताप आणि ऑक्सिजनची पातळी पडताळण्यासह आधुनिक वैद्यांचा समुपदेश घ्यावा. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा कोरोना असलेल्यांनी आधुनिक वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रुग्णाला रुग्णालयात २-३ दिवस रहावे लागते. प्रकृती सुधारते. प्रारंभीच्या दिवसांमध्ये औषध दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारण्यास साहाय्य होते. नागरिकांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात असून महागड्या औषधांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही.’’