महाराष्ट्र शासन १८ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोनावरील लसीकरण विनामूल्य ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोनावरील लसीकरण विनामूल्य करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार असून अधिकाधिक लस खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या वेळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘मागील मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन यावर एकमत झाले होते. लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार आहेत. केंद्रशासनाने १ मेपासून देशभरातील १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना केंद्रशासन लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. ‘कोविशिल्ड’ लस केंद्राला १५० रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयांना मिळणार आहे.’’