अकोला येथे रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणी ५ जणांना अटक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला येथे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता
अकोला – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी २४ एप्रिल या दिवशी शहरात धाड टाकून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या ५ आरोपींना अटक केली आहे. याच दिवशी आरोपींना न्यायालयात उभे केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हिंगमिरे यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या आरोपींकडून पोलिसांनी १ लाख ६७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ रेमडेसिविर इंजेक्शनचा समावेश आहे.
शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. उपचाराअभावी नागरिकांचा मृत्यू होत आहे. असे असतांना रामनगर येथे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माहितीची निश्चिती केल्यानंतर आशिष समाधान नावाचा तरुण हे इंजेक्शन विना कागदपत्र, विना देयक, तसेच आधुनिक वैद्यांच्या अनुमतीविना विकत असल्याचे समजले. त्यानंतर ४ सहस्र रुपयांचे हे इंजेक्शन २५ सहस्र रुपयांना इंजेक्शन विकतांना आशिष पकडला गेला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील राहुल बंड, सचिन दामोदर, प्रतीक शहा, अजय आगरकर या ४ आरोपींना अटक केली.