संभाजीनगर येथील मिनी घाटी रुग्णालयातून ५ रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी !
परिचारिकेची पोलीस ठाण्यात तक्रार
रुग्णालयाच्या शीतकपाटातून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी होते, म्हणजे रुग्णालयातीलच कुणाचातरी यात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा पडताळून इंजेक्शनची चोरी करणार्या संबंधिताला कठोर शासन होणे अपेक्षित !
संभाजीनगर – चिकलठाणा येथील मिनी घाटी जिल्हा रुग्णालयातून २३ एप्रिल या दिवशी ५ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी झाली आहे. १६ एप्रिल या दिवशी याच रुग्णालयातील एका चतुर्थश्रेणी कर्मचार्याने रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकल्याची घटना उघडकीस आली होती. आता ही दुसरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. या रुग्णालयातील एका परिचारिकेच्या तक्रारीवरून एम्.आय.डी.सी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२३ एप्रिल या दिवशी दुपारी मिनी घाटीतील विभाग ‘सी’मध्ये १६ रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात आली. विभागप्रमुखाने ती शीतकपाटात ठेवले. २४ एप्रिल या दिवशी सकाळी या विभागाच्या परिचारिकेने रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी शीतकपाट उघडले असता तेथे केवळ ११ इंजेक्शने असल्याचे दिसून आले. परिचारिकेने इंजेक्शन कुणाला दिले का ? याची खातरजमा केली; मात्र प्राप्त १६ पैकी एकही इंजेक्शन वापरले गेले नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे ही ५ इंजेक्शने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. संबंधित घटना मिनी घाटी रुग्णालयाच्या वरिष्ठांना कळवण्यात आली.