कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुढील ६ मासांमध्येही मृत्यूचा धोका असतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

कोरोनामुक्त रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक- संशोधन

नवी देहली – कोरोनामुक्त झालेल्या लोकांनाही संसर्ग झाल्यापासून पुढचे ६ मास मृत्यूचा धोका अधिक असतो. यामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करावे न लागलेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती संशोधनामधून समोर आली आहे. ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये संशोधकांनी याविषयी सांगितले आहे.

१. संशोधकांच्या म्हणण्यानुसार संसर्गातून बरे झाल्यानंतर आजाराच्या पहिल्या ३० दिवसांनंतर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुढच्या ६ मासांपर्यंत इतर लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका ६० टक्के अधिक असतो. या ६ मासांपर्यंतच्या काळात कोरोनामुक्त झालेल्या सर्व लोकांमध्ये प्रती १ सहस्र रुग्णांमागे ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये ज्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासते आणि जे निदान झाल्यानंतर ३० दिवसांमध्ये बरे होतात अशा प्रती १ सहस्र रुग्णांमागे २९ मृत्यू अधिक होतात, असे दिसून आले आहे.

२. संशोधकांनी रुग्णांकडून घेतलेल्या माहितीमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर या आजारामुळे झालेले विविध दुष्परिणाम समोर आले आहेत. या दुष्परिणामांमध्ये श्‍वसनाची समस्या, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि केसगळती यांचा समावेश आहे.