श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
१. उच्च विचारांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि त्यांमुळे दैवी कार्य घडत असल्याने मनाला त्यांचे खाद्य देऊन ते निरोगी ठेवावे !
‘आयुष्यात कधीही स्वतःला न्यून लेखू नका. कनिष्ठ विचार करू नका. नकारात्मकतेत जाऊ नका. त्याऐवजी उच्च आणि व्यापक विचारांनी मोठे व्हा. उच्च विचारांमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा तुमच्या मनाला चांगले कार्य करण्यासाठी प्रभावित करणारी असते. केवळ चांगल्या विचारांनीसुद्धा हातून दैवी कार्य घडते. अन्नापेक्षा शरिरावर पडणारा विचारांचा प्रभाव अधिक सूक्ष्म असतो. ज्यांचे मन चांगले असते, त्यांचे आरोग्यही आपोआपच चांगले रहाते; म्हणूनच शरिराबरोबरच मनालाही चांगल्या दैवी विचारांचे खाद्य द्या आणि निरोगी रहा.’
२. तळमळीने साधना करून भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद असणे
‘आपण कधीही काही कमवत नाही आणि गमावतही नाही; कारण प्रत्येक कर्म करणारा कर्ता-करविता तर ईश्वरच आहे. मग कसले दुःख आहे ? त्या जगाच्या पालनकर्त्यावर सर्व सोडून द्या आणि निर्धास्त मनाने साधना करा आणि पहा तर खरं, तो आपल्यासाठी काय काय करतो ते ! भगवंताची लीला अनुभवण्यातच खरा आनंद आहे. तळमळीने साधना करण्याचे दायित्व केवळ आपले आहे. त्यानंतर तोच तुम्हाला फुलासारखा जपतो. तुम्ही सर्वस्वी त्याचे झालात की, तो कायमचाच तुमचा होतो.’
३. ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांमध्ये देवच असल्याने ते इतरांसाठी आधारस्तंभ बनणे, आपणही त्यांच्यासारखे साधनेने सक्षम बनून इतरांंचा आधार बनणे आवश्यक !
‘स्वतःला एवढे सक्षम करा की, तुमचा इतरांना आधार वाटायला हवा. एवढे छान प्रयत्न (साधना) करा की, तुम्ही दुसर्यांचा आधार बना; कारण तुमच्या साधनेमुळे इतरांना तुमच्यात असणार्या ईश्वरी तत्त्वाचाच आधार वाटू लागतो. मानव मानवाला आधार देऊ शकत नाही. साधक साधकाला आधार देऊ शकत नाही; परंतु संत मात्र इतरांना आधार देतात; कारण ते ईश्वराचेच एक सगुण रूप आहेत. संतांमधील देवच इतरांचा आधारस्तंभ बनतो.’
४. ‘आपत्काळात देवानेही आपली आठवण काढावी, यासाठी आतापासूनच साधना करा !’
‘आपत्काळात आपल्याला पुढारी, राजकारणी, नटनट्या, कलाकार, साहित्यिक, गायक यांपैकी कुणाचीच आठवण येत नाही, तर आठवतो तो केवळ ईश्वर; परंतु आपत्काळात त्या देवानेही तुमची आठवण काढली पाहिजे, यासाठी आतापासूनच साधना करा !’
५. मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित संगमाने केलेली सेवा ‘परिपूर्ण सेवा’ होऊन आनंद मिळणे आणि त्यामुळे देव अधिकाधिक जवळ येणे
‘आपण तत्त्वरूपाने जे शिकलो, ते आता कृतीत आणणे आवश्यक आहे. केवळ शिकण्यातून मन सकारात्मक बनते; परंतु शिकलेले प्रत्यक्ष कृतीत आणले, तर बुद्धीही मनासोबत सेवा करू लागते. ‘मन आणि बुद्धी’ यांच्या एकत्रित संगमाने निर्माण झालेली ऊर्जा तुम्हाला सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवून देते. यालाच ‘परिपूर्ण सेवा करणे’, असे म्हणतात. परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार अंगी बाणवला असता ‘मन आणि बुद्धी’ अगदी चांगल्या समजूतदार मित्रांप्रमाणे हातात हात घालूून सेवा करू लागतात. यामुळे आपल्याला मिळणार्या सेवेतील आनंदाचे प्रमाण वाढते. सेवेतील आनंद वाढला की, देव तुमच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो.’
६. ज्या गुरूंनी जन्मोजन्मी आपल्यासाठी कष्ट घेतले आहेत, त्यांना ‘स्वतः उत्तम शिष्य बनून दाखवणे’, हीच खरी त्यांना आवडणारी गुुरुदक्षिणा असणे
‘आतापर्यंत गुरूंनी आपल्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. ‘आपल्या अनेक पूर्वजन्मांमध्ये गुरूंनी आपल्याला कसे सांभाळले असेल ?’, याविषयी कल्पना करणेही कठीण आहे. त्यांनीच आपल्याला जीवनात क्षणोक्षणी सावरले आहे. त्यांच्या अनंत जन्मांच्या कृपेमुळेच आज आपण या देवमार्गाला लागलो आहोत. आपल्या गुरूंनी आपल्याला साधनेत इथपर्यंत आणण्यासाठी केवढे अपार कष्ट घेतले असतील, त्रास सोसले असतील, हे केवळ त्यांनाच ठाऊक ! ते कधीच याविषयी बोलून दाखवणार नाहीत; पण साधना करण्याची जी संधी गुरूंच्या कृपेने आपल्याला लाभली आहे, तिचे आता सार्थक करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत श्री गुरूंनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यांप्रती कृतज्ञता म्हणून तरी आपण साधनेत पुढे जाण्यासाठी कष्टाने तीव्र प्रयत्न करायला हवेत, मग कितीही संघर्ष झाला तरी चालेल ! गुरूंना आपण त्यांचा ‘उत्तम शिष्य’ बनून दाखवले पाहिजे. यापेक्षा त्यांना आवडणारी ‘गुरुदक्षिणा’ ती कोणती ?’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ