परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी वास्को, गोवा येथील साधकांनी अनुभवलेले भावक्षण !
१. श्री. सावळो नरहरि मडगावकर
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिद्धता करतांना मन आनंदाने ओसंडून ‘नाचावे’, असे वाटणे, त्या भावातच सर्व सिद्धता केली जाणे, नामजपही एका लयीत, एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे : जन्मोत्सवाच्या दिवशी मी पहाटे ४.४५ वाजता उठून प.पू. गुरुदेवांचे स्मरण करत होतो. त्या वेळी मला प्रत्यक्ष ‘प.पू. गुरुदेव घरात वावरत आहेत’, असे जाणवत होते. बाहेर पक्ष्यांंचा चिवचिवाट चालू होता. जणू वातावरणात चैतन्याचा वर्षाव होत होता. माझा नामजप एका लयीत, एकाग्रतेने आणि भावपूर्ण होत होता. आज ‘प.पू. गुरुदेव घरी येणार आहेत’, या भावाने घराची स्वच्छता आणि शुद्धी करतांना मला उत्साह अन् आनंद वाटत होता. ‘आज माझा देव येणार’, या विचाराने मला ‘नाचावे’, असे वाटले. मी त्या नादात नाचतच जवळपास सर्व सेवा केल्या. माझ्या अंतर्मनात आनंद ओसंडून वहात होता. मला पूर्ण दिवस केवळ गुरुदेवांचेच स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती. आमच्या घरातील वातावरण गुरुमय झाले होते.
या अनुभूती लिहितांनाही मला मनात आनंदाच्या लहरी जाणवत होत्या. आम्हाला हे सर्व केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच अनुभवायला मिळाले.
२. श्री. रमेश दत्ता फडते
जन्मोत्सव भावसोहळा ‘ऑनलाईन’ दाखवायचा होता. माझ्याकडे श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरी हा सोहळा दाखवण्याचे दायित्व होते.
२ अ. पूजा करतांना गुरुदेवांच्या ग्रंथासमोर नकळत प्रथम फूल वाहिले जाणे : मी सकाळी उठून फुले आणण्यासाठी खाली गेलो. ‘तेव्हा वातावरणात काहीतरी पालट झाला असून वातावरण एकदम आनंदी आहे’, असे मला जाणवत होते. पूजा करतांना माझ्याकडून प्रथम गुरुदेवांच्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप’, या ग्रंथासमोर फूल वाहिले गेले.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरातील प्रसन्न वातावरणामुळे मनावर आलेले दडपण नष्ट होणे आणि ‘ऑनलाईन’ कार्यक्रमासाठी जोडणी लवकर होणे : मी यापूर्वी कधीही स्वतंत्ररित्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमासाठी जोडणी केली नव्हती. ‘त्यामुळे माझ्याकडून सर्व व्यवस्थित होईल ना ?’, अशी शंका मला येत होती; पण ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या घरातील प्रसन्न वातावरण पाहून माझ्या मनावर आलेले दडपण गेले आणि ‘जोडणी कधी पूर्ण झाली ?’, ते मला समजलेच नाही. ‘संतांचे घर म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम आहे’, याची मला प्रचीतीच आली.
२ इ. दोन्ही भावसोहळे पहातांना ‘हे भावसोहळे अन्य लोकांत होत असून गुरुतत्त्वाच्या छत्रछायेखाली असल्याने श्वास घेऊ शकत आहे आणि साधना करू शकत आहे’, असे वाटणे : ‘ऑनलाईन’ भावसोहळा मला श्री. राजेंद्र नाईक यांच्याकडे जाऊन दाखवण्याची संधी मिळाली. दोन्ही दिवसांचे सोहळे पहातांना ‘गुरुपौर्णिमा महोत्सव अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते. सोहळ्यात काही प्रसंग पहातांना किंवा आठवतांना डोळ्यांतून अश्रू येत होते. त्या वेळी ‘मी भूतलावर नसून अन्य कुठेतरी आहे आणि हा भावसोहळा पहात आहे’, असे मला सारखे वाटत होते. माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती. ‘गुरुतत्त्व कार्यरत असून ते आमच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घेत आहे’, असे मला पदोपदी जाणवत होते. ‘माझा हा देह किडा-मुंगीसारखा कधीही चिरडला गेला असता; पण गुरुदेवांनी त्यांच्या कृपेच्या छत्रछायेखाली मला ठेवल्याने हा जीव श्वास घेऊ शकत आहेे’, असा विचार पहिल्या दिवशीचा ‘ऑनलाईन’ भावसत्संग पहातांना मनात आला. ‘दोन्ही दिवसांचे सोहळे कधी संपले ?’, ते मला कळलेच नाही. ‘मी ३ घंटे एका जागी बसून आहे’, असे मला वाटतच नव्हते.
गुरुदेवा, कधी कधी आपली आठवण येते किंवा आपले रूप डोळ्यांसमोर आले की, अश्रू येतात. पूर्वी असे कधी होत नव्हते. ‘या अज्ञानी बालकाला असे का होते ?’, हे कळत नाही. यालाच भावाश्रू म्हणतात का ? ‘या देहाला आपणच आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे’, त्यासाठी हा देह आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
३. सौ. मीनाक्षी नाईक
३ अ. सद्गुरु नंदकुमार जाधव ‘कृतज्ञता गीत’ म्हणतांना पिवळा प्रकाश दिसून सुदर्शनचक्र सृष्टीत चैतन्य प्रक्षेपित करतांना दिसणे : जन्मोत्सवाच्या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधव ‘कृतज्ञता गीत’ म्हणत होते. तेव्हा मला पिवळा प्रकाश दिसला. ‘सृष्टीत सुदर्शनचक्र फिरत असून त्याचे चैतन्य सगळीकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मी २ मिनिटे अनुभवले.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |