सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान !
राष्ट्रीय पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – उत्कृष्ट कार्य केल्याविषयी सातारा जिल्हा परिषदेला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहता या २ पंचायत समित्यांसह राज्यातील १६ ग्रामपंचायतींना विविध गटांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. दूरदृश्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) प्रणालीच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे पंतायतराज मंत्री, महाराष्ट्राचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते. या वेळी देशातील एकूण ३१३ ग्रामपंचायतींना गौरवण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेला रोख ५० लाख रुपये, तर गडहिंग्लज आणि राहता या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये रोख देण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम लगेच खात्यांवर वर्ग करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि वाई तालुक्यातील देगाव या २ ग्रामपंचायतींना विविध गटातील कामाच्या गुणवत्तेनुसार पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावाच्या लोकसंख्येनुसार ५ ते १५ लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत.
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीला नानजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार !सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी या गावाने नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार-२०२१ पटकावला आहे. या ग्रामपंचायतीस केंद्र सरकारकडून १० लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात प्रदान करण्यात आले. |