हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सोलापूर येथे ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन !
सोलापूर, २५ एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींमध्ये राष्ट्राभिमान जागृत व्हावा, तसेच श्रीराम आणि हनुमान यांची भक्ती करून स्वतःत भक्तीभाव निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी युवांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. या बलोपासना वर्गामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अशा विविध ठिकाणांहून संगणकीय प्रणालीद्वारे अनेक युवक-युवती नियमित सहभागी होत आहेत.
या सप्ताहात पहाटे ६ ते ७ या वेळेत होणार्या बलोपासना वर्गामध्ये प्रारंभी श्रीरामाचा सामूहिक नामजप घेण्यात येत आहे. त्यानंतर शारीरिक व्यायाम प्रकार, श्रीरामाच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगाचे श्रवण, शारीरिक सराव, हनुमंताच्या जीवनातील बोधप्रद प्रसंगांचे श्रवण आणि शेवटी हनुमंताचा नामजप, अशा क्रमाने हा वर्ग पूर्ण होतो. बलोपासना वर्गामुळे एकाग्रता वाढणे, आत्मविश्वास निर्माण होणे, शारीरिक क्षमता विकसित होणे, गुणवृद्धी होणे, असे अनेक लाभ होत असल्याचे वर्गातील युवक आणि युवती यांनी सांगितले.