सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्सची उभारणी !

कोविड केअर सेंटर्स

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आदींच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. सातारा शहरातील पुष्कर मंगल कार्यालय याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ८० खाटांचे रुग्णालय सज्ज करण्यात येत असून त्यातील ३२ खाटा ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. खटाव तालुक्यात पडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये ७० खाटांचे रुग्णालय चालू करण्यात येणार असून त्यापैकी २० खाटा सध्या उपयोगात आहेत.

तसेच याठिकाणी ३० खाटा ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. कराड तालुक्यातील वडगाव हवेली गामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहामध्ये ११० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जावळी तालुक्यात सध्या मेढा आणि रायगाव या ठिकाणी १०६ खाटांची व्यवस्था असून ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या अजून वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.