मलंगगडाच्या पायथ्याशी घातक रसायनांच्या पिंपांची विल्हेवाट, ४ जणांना अटक
घातक रसायनांच्या पिंपांची अनधिकृतरित्या विल्हेवाट लावून लोकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई झाल्यास पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !
ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या जवळील कुशीवली गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी १०० हून अधिक घातक रसायनांचे पिंप टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी अन्वेषण करून नियाज खान, मुस्ताक खान, अब्दुल अजीमुल्ला खान आणि रवींद्र यादव यांना अटक केली आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि तळोजा या भागातून हे विषारी रसायनांचे पिंप विल्हेवाट लावण्यासाठी आणले होते. त्यांची अनधिकृतरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. या पिंपांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील अन्वेषण चालू आहे.