सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे इस्त्री करतांना आलेल्या अनुभूती

‘महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात विविध यज्ञ होतात. गेल्या काही यज्ञांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ आहुती देण्यासाठी बसले होते. त्या वेळी ते नेसणार असलेले सोवळे आणि उपरणे यांना काही दिवस इस्त्री करण्याची संधी देवाच्या कृपेने मला मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे सोवळे-उपरणे

श्री. भूषण कुलकर्णी

अ. उपरण्याला इस्त्री करतांना प्रतिदिन त्यातून सुगंध दरवळत असल्याचे मला जाणवायचे. तो सुगंध मला उपरण्यापासून १.५ मीटर अंतरापर्यंत येत असे आणि इस्त्री करतांना त्या सुगंधात उत्तरोत्तर वाढ होत असे.

आ. सोवळ्याला इस्त्री करतांनाही १.२ मीटर अंतरापर्यंत सुगंध दरवळत असे. सोवळे इस्त्री करतांना ‘मी एका निर्गुण पोकळीत आत आत जात आहे’, असे मला जाणवायचे. याचा अर्थ सोवळे उपरण्याच्या तुलनेत निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याचे मला जाणवले.

इ. मी सोवळे आणि उपरणे इस्त्री करण्यापूर्वी प्रार्थना करून काही वेळ श्रीविष्णु, काही वेळ श्री सिद्धिविनायक आणि काही वेळ श्री भवानीदेवी यांचा नामजप करत असे; पण श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचा नामजप करतांना अनुमाने २ – ३ मिनिटांनी त्या देवतांच्या नामजपाऐवजी श्रीविष्णूचाच नामजप माझ्याकडून होत असे, तसेच माझ्याकडून श्‍वासही दीर्घ घेतला जात असे. दीर्घ श्‍वास घेतला जाणे, म्हणजे शांती अनुभवणे.

ई. सोवळे आणि उपरणे यांच्यामध्ये सोवळे कापसासारखे हलके, तर उपरणे जड जाणवायचे. उपरणे जड जाणवण्याविषयी लक्षात आले की, सद्गुरु गाडगीळकाका यज्ञाला बसल्यावर त्यांच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींकडून सतत आक्रमण होत असते. हे आक्रमण उपरण्याच्या माध्यमातून रोखले जाते. (शास्त्रानुसार पूजेच्या वेळी पूजनकर्त्याची सूर्यनाडी कार्यरत रहाण्यासाठी उपरणे परिधान केले जाते. – संकलक) त्यामुळे ते (शक्तीचे प्रमाण अधिक असल्याने) जड लागत होते. असे असले तरी त्यातून खूप सुगंध येत होता.

उ. सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.

२. पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे

अ. पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे आणि उपरणे इस्त्री करतांना कापरासारखा सुगंध यायचा. त्यावरून पू. नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये शिवतत्त्व असल्याचे जाणवले. हा सुगंध १ मीटर अंतरापर्यंत जाणवत असे.

आ. पू. नीलेशदादांचे उपरणेही सद्गुरु गाडगीळकाकांच्या उपरण्याप्रमाणे जड, तर सोवळे हलके जाणवत असे.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(११.१.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक