खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून अनुमती देण्यापूर्वी प्रशासनाने त्यांचे ऑडिट पडताळावे ! – किशोर पाटील, संपादक तथा कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
रुग्णालयांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी केली मागणी
ठाणे, २४ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांची संख्या न्यून पडत आहे. अशा वेळी खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून अनुमती दिली जाते. ती देण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने त्यांचे सर्व प्रकारचे ऑडिट पडताळून घ्यावे, म्हणजे दुर्घटना घडणार नाहीत. मागील २ – ३ मासांमध्ये रुग्णालयांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीच ऑडिट पडताळले गेले असते, तर या दुर्घटना टळल्या असत्या, अशी खंत दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री. किशोर बळीराम पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांची व्यवस्था करून रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. खाटा वाढवण्यसाठीही प्रशासन प्रयत्न करत आहे; पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे खाटा न्यून पडत आहेत. अशा वेळी स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना अनुमती दिली जाते; मात्र त्याच वेळी अग्नीसुरक्षा यंत्र, ऑक्सिजन व्यवस्था, स्ट्रक्चरल आणि विद्युत ऑडिट यांचे अहवाल पहाणे आवश्यक आहे; मात्र ते पडताळले जात नसल्याने दुर्दैवाने काही रुग्णालयांना आग लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच या घटना घडल्याचा आरोप नागरिक अन् विरोधक यांच्याकडून केला जात आहे.’’