मुंबईतील १२ रुग्णालयांमध्ये हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार !

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांना होत असलेल्या अपुर्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका मासात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या प्रकल्पांतून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. हे प्रकल्प १६ वर्षे चालू शकतील. महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये वातावरणातील हवा शोषून पी.एस्.ए. तंत्राचा उपयोग केला जातो. यंत्रामध्ये योग्य दाबाने हवा संकलित करून ती शुद्ध करण्यात येते. त्यामुळे धूळ, तेल, इंधन आदी हवेतील अतीसूक्ष्म कण वेगळे केले जातात. शुद्ध झालेली हवा ‘ऑक्सिजन जनरेटर’ मध्ये संकलित केली जाते. तेथे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो. वेगळा केलेला ऑक्सिजन योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवून रुग्णांपर्यंत पाईपद्वारे पोचवला जातो.