पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी नामस्मरण आणि त्याचे होणारे लाभ यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
१. नामस्मरण का करावे ?
१ अ. देहातील विकार दूर करण्यासाठी देवाचे नामस्मरण करणे आणि गुरूंना शरण जाणे, हेच उपाय असणे : ‘आपल्याच देहात दडून बसलेले, वायूरूपाने आपला प्रताप दाखवणारे, आम्हाला आपल्याच नियंत्रणात ठेवणारे, महाभयंकर विकार असतात. आपल्याला ते दिसत नाहीत; परंतु ते प्रबळ आणि शक्तीमान आहेत. आम्ही जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत ते आपला पिच्छा सोडत नाहीत. देवाचे नामस्मरण आणि गुरूंना शरण जाणे, हेच त्यावर उपाय आहेत.’
२. नामस्मरणातील अडथळे
२ अ. देहामध्ये वाईट शक्ती असल्यास त्यांना देवाचे नाम सहन न होणे आणि त्यामुळे त्यांना देवाजवळ नामाला बसता न येणे अन् त्या वेळी ‘पुण्य सोपे नसून महाग असणे’, हे लक्षात येणे : ‘सगळीकडे बसावे’, असे वाटते; परंतु ‘आपल्या घरात ध्यानाला अर्धा घंटासुद्धा बसू नये’, असे का वाटते ? त्याचे कारण देहामध्ये वाईट शक्ती लपून बसलेल्या असतात. त्यांना देवाचा नामजप सहन होत नाही. मग ते त्यांच्याकडे असलेली शस्त्रे फेकायला प्रारंभ करतात. ध्यानाला बसल्यावर देवाकडून पुण्य मिळते. ते पुण्य या वाईट शक्ती जमा करू देत नाहीत. त्यांची शस्त्रे अशी असतात की, त्यांना जांभया सुटतील, कंटाळा येईल आणि झोपच येईल किंवा कुणीतरी मध्येच येऊन हाक मारील. त्यामुळे मन चलबिचल होईल. अशी सगळी भुताटकी उभी रहाते. वेताळ, झोटींग आणि स्वतःचे पितरसुद्धा ध्यानाला बसू देत नाहीत. दूरचित्रवाणीजवळ रात्रीपासून सकाळपर्यंत बसाल. चार-चार घंटे अनावश्यक गप्पा माराल; परंतु देवाजवळ कुणी नामजपाला बसणार नाही. पुण्य सोपे नाही. ते महाग आहे. पाप स्वस्त आहे. त्यामुळे सगळेच पाप करतात.’
२ आ. वाईट शक्तीला देवाचे नाव घेण्याचा कंटाळा असल्याने सतत हट्ट करून नामस्मरण करावे ! : आपल्या शरिरामध्ये वायूरूपाने उजव्या बाजूला देवांचे स्थान आहे. डाव्या बाजूला भुताटकी, म्हणजे सर्व घाणेरडे विकारही वायूरूपाने आहेत. देवाचे सतत नामस्मरण करून त्यांना पराभूत करावे. त्यांना देवाचे नाव घेण्याचा कंटाळा येतो; म्हणून सतत हट्ट करून नामस्मरण करावे. मी माया आणि चंचल मन यांचे पेकाटच मोडून टाकले आहे.’
३. नामस्मरणाचे लाभ
३ अ. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ होते ! : ‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘ज्याचे अंतःकरण शुद्ध आणि निर्मळ आहे. त्याच्याजवळ देव धावून येतो.’ माणसाला देव दिसत नाही; म्हणून नास्तिक ‘देव नाही’ म्हणतात. अरे, गायीच्या ओटीत गोड दूध असते; परंतु ते वासरू आणि धनी पितो. गोचडी जवळच असते; पण ती रक्त सेवन करते. ‘आपल्या अंतःकरणात देवाचे वारे खेळावे’, असे वाटत असेल, तर सतत नामस्मरण करून आपले अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवायला हवे. त्यानंतरच तुमच्या शरिरामध्ये देव प्रवेश करील. देव स्वच्छ जागेवर बसतो. विकारांच्या घाणीवर माशा बसतात.’
३ आ. अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र ठेवून सतत परमेश्वराचे नामस्मरण केल्यास जिवाला आनंद अन् शांती मिळेल ! : मनुष्याला सुख, समाधान, आनंद आणि शांती पूर्वपुण्याईने मिळते. मनुष्याने सत्याच्या मार्गाने चालले पाहिजे आणि धर्माप्रमाणे आचरण केले पाहिजे. परोपकार करणे, नीतीने चालणे, चंचल मन आवरणे, अंतःकरण स्वच्छ आणि पवित्र ठेवणे, स्थिर रहाणे, सतत परमेश्वराचे नामस्मरण करणे, ध्यानाला बसणे, असे केल्याने तुमच्या जिवाला शांती मिळेल. आनंद आणि शांती सगळ्यांनाच हवी आहे; परंतु ती किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही; कारण ती भगवंताकडे आहे. ती मिळवण्यासाठी भक्ती करा.’
३ इ. केवळ देवाच्या नामानेच बुद्धी स्वच्छ होत असणे : ‘शांत बसून निरूपण ऐकावे. तुमची बुद्धी गढूूळ पाण्यासारखी आहे. ती स्वच्छ नाही. देवाच्या नामाने बुद्धी सतत धुतली जाते. तुमची बुद्धी संसार आणि राजकारण यांत बरबटलेली आहे. ती नेहमी चुकीचे निर्णय घेईल. त्यामुळे कार्याची हानी होते.’
३ ई. सतत नामस्मरणामुळे ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे यांची कामवासना नष्ट होणे : ‘माझा हात सुंदर स्त्रीला लागला किंवा सुंदर स्त्रीचा हात माझ्या अंगाला लागला, तरीही मला कामवासनेचा विकार, म्हणजे ‘शॉक’ लागत नाही. पांडुरंगाने माझा देह पवित्र, निर्मळ आणि पुण्यवंत बनवला आहे. ‘हे सर्व कसे झाले ?’, तर ईश्वराचे नाम सतत माझ्या मुखामध्ये असते; म्हणून माझ्या दृष्टीने गाय आणि बाय सारखी झाली आहे.’
४. ‘घरे आणि माणसे पवित्र अन् पापमुक्त करायची असतील, तर घराघरांत, वाडीत नामस्मरण चालू करावे. दुसरा पर्याय नाही.’
– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
|