तक्रारदारांना साहाय्य न करता त्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवणारे आणि गलथान कारभार करणारे पोलीस !
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१८ एप्रिल या दिवशीच्या लेखात समाज आणि पोलीस यांच्यात निर्माण होणार्या अन् रुंदावत जाणार्या दरीस पोलिसांचा कर्तव्यचुकारपणा कारणीभूत, अदखलपात्र आणि दखलपात्र गुन्ह्यांच्या तक्रारींचे स्वरूप, पोलीस अदखलपात्र गुन्हा नोंदवून दायित्व टाळण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तक्रारदारांनी अभ्यासपूर्वक तक्रार करावी आणि नियमबाह्य प्रतिबंधात्मक कारवाई करून स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आदींविषयीची माहिती वाचली. या पुढचा भाग येथे देत आहोत.
६. तक्रार स्वीकारतांना दखलपात्र गुन्ह्याच्या स्वरूपात पालट करून त्याला अदखलपात्र करत तक्रारकर्त्याची फसवणूक करणारे पोलीस !
दखलपात्र गुन्ह्याची पोलिसांना तात्काळ नोंद घ्यावी लागते. तक्रारदार हा घायाळ अवस्थेत शासकीय किंवा अन्य रुग्णालयामध्ये असेल आणि तो तक्रार देण्याच्या स्थितीत नसेल, तर घटनेची माहिती असणारी व्यक्ती तक्रार देऊ शकते. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणार्या तक्रारदाराची तक्रार ऐकून घेतली जाते, उदा. एखादी व्यक्ती ‘पीडिताच्या डोक्यावर काठीने मारहाण केली’, अशी तक्रार देत असेल, तर तो दखलपात्र गुन्हा होतो; कारण डोक्याला दुखापत झाली असेल किंवा नसेलही, डोक्यावर काठीने मारहाण करणे, हा दखलपात्र गुन्हा आहे. असा दखलपात्र गुन्हा ‘बर्कींग’ करायचा असल्यास पोलीस तक्रार घेतांना शब्दप्रयोग फिरवून तक्रार नोंदवतात. त्यामुळे त्या दखलपात्र गुन्ह्याचे स्वरूप न्यून होऊन अदखलपात्र गुन्हा रजिस्टरमध्ये नोंद करून घेतला जातो. या गोष्टीची तक्रारदाराला कल्पना नसते. काही वेळा तक्रारदारालाच अर्ज लिहून आणण्यास सांगून अर्ज स्वीकारला जातो. अशा प्रकारे गुन्हा ‘बर्कींग’ केला जातो. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांनी लिहून घेतलेली तक्रार वाचल्यावरच स्वाक्षरी करावी.
७. पोलिसांनी हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याला अकस्मात् मृत्यू ठरवणे आणि त्यातून दिसून येणारा पोलीस विभागाचा पाट्याटाकू कारभार !
अ. काही वेळा पोलीस हत्या झालेली असतांना त्याला अकस्मात् मृत्यू ठरवतात आणि त्याप्रमाणे अन्वेषण करतात. या संदर्भात घडलेली एक सत्य घटना पुढे देत आहे. वर्ष २००५ मध्ये मी खेड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होतो. एके दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पोलीस ठाण्यात दूरभाष केला आणि मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे एम्.आय.डी.सी.च्या परिसरात एका सुक्या गटारामध्ये एक मनुष्य मृतावस्थेत पडून असल्याचे सांगितले. एवढे सांगून त्याने स्वत:चे नाव न सांगता दूरभाष ठेवून दिला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि आम्ही ३ कर्मचारी असे सर्व जण घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळ हे मुंबई-गोवा महामार्गावर असले, तरी रहदारीचे नव्हते. मृतदेह २ फूट खोल गटारात उताणे स्थितीत पडला होता. देहावर विविध ठिकाणी जंतू बाहेर आले होते. झाडाच्या टाळ्याने जंतू बाजूला केल्यावर गळ्याखाली अंडाकृती धारदार शस्त्राची जखम होती, तसेच पोट आणि छाती यांच्या भागावरही धारदार शस्त्राने भोसकल्याच्या जखमा होत्या. ज्या ठिकाणी जखमा होत्या, त्या ठिकाणी शटर्र्ला छिद्र नव्हते. त्यावरून त्या व्यक्तीची हत्या केल्यावर तिच्या अंंगावरील रक्ताचे कपडे पालटून तिला येथे अज्ञात वाहनाने आणून टाकले होते. हा मृतदेह ४ – ५ दिवसांपूर्वीचा दिसून येत होता. या कालावधीत जिल्ह्यामध्ये व्यक्ती हरवल्याची तक्रार नव्हती. यावरून मृत मनुष्य हा जिल्ह्याबाहेरील असल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षण चालू असतांना समवेत आलेले पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक हे दोघेही घटनास्थळी नव्हते. त्यामुळे मी पोलीस निरीक्षकांना दूरभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘मी पोलीस ठाण्यात निघून आलो आहे. तुझ्या जोडीला एक पोलीस उपनिरीक्षक आहे. तू काय ते बघून घे’, असे बोलून त्यांनी दूरभाष बंद केला.
आ. पोलीस उपनिरीक्षक आणि मी अकस्मात् मृत्यू म्हणून नोंद करण्याचा निर्णय घेतला. हत्येच्या गुन्ह्यात मयताच्या पंचनाम्यात त्याच्या शरिरावरील जखमांचे स्वरूप लांबी-रूंदीसह लिहावे लागते. तसेच त्या जखमा कशामुळे झाल्या (धारदार शस्त्राने, दगडाने कि काठीने) याचाही निष्कर्ष नमूद करावा लागतो. त्यात वैद्यकीय अधिकार्याने तसे प्रमाणपत्र दिले नाही, तर अन्वेषणाची दिशाच पालटते. त्यामुळेे आपल्याला त्रास होतो.
या ठिकाणी ‘अकस्मात् मृत्यू’ अशी नोंद केली. मयताच्या अंगावरील जखमांचे स्थान आणि स्थिती पंचनाम्यात नमूद करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवले. वैद्यकीय अधिकार्याने मृताचे शवविच्छेदन करून ‘गंभीर जखमांमुळे अतीरक्तस्राव होऊन मृत्यू’, असे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ‘वैद्यकीय अधिकार्याला जखमा कशामुळेे झाल्या आहेत ?’, असे लेखी विचारले. तेव्हा त्याने ‘जखमा अपघातामुळेही होऊ शकतात’, असे लेखी मत दिले. त्यानंतर ३ मास उलटून गेल्यावरही कुणीच नोंद घेण्यासाठी पोलीस ठाण्यात न आल्याने ते प्रकरण ‘फाईल’ करण्यात आले. यावरून प्रत्यक्ष वस्तूस्थितीवरून हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप कसे न्यून केले जाते, हे लक्षात येते. शेवटी ‘पोलीस करील ते होईल’, असे म्हटले जाते, ते यामुळेच !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– एक माजी पोलीस अधिकारी
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/481764.html
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !पोलीस-प्रशासन यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधितांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : socialchange.n@gmail.com |