एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत. त्यामुळे या आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत. आतापर्यंतच्या लेखात आपण साहित्य आणि वास्तू, रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशी-तैशी, तांब्या किंवा ‘मग’ ऐवजी सलाईनच्या बाटलीचा वरचा भाग कापून केलेला डबा ठेवलेला असणे, जनसेवेच्या माध्यमातून ईश्‍वरसेवा करण्याची संधी लाभलेल्या रुग्णालयासारख्या ठिकाणी जनतेला पाण्यासाठी लुबाडले जाणे, आहाराच्या स्वच्छतेविषयीची उदासिनता आणि रुग्णालयातील आधुनिक वैद्यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्व कर्मचार्‍यांचे वागणे यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

८. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्व कर्मचार्‍यांचे वागणे

८ इ. रुग्णालयातील कर्मचार्‍यांना स्वतःच्या चाकराप्रमाणे वागवणार्‍या परिचारिका आणि त्यावर काहीच उपाययोजना (कारवाई) न करणारे रुग्णालयाचे व्यवस्थापन ! : एकदा मी तेथील पहारा सेवा करणार्‍या मुलीशी बोलले. तेव्हा लक्षात आले की, पहारा, स्वच्छता अशा प्रकारच्या सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना तेथील परिचारिका चाकराप्रमाणे (नोकराप्रमाणे) वागवतात. त्यांच्याकडून स्वतःची वैयक्तिक कामेही करून घेतात. याविषयी तक्रार केल्यास व्यवस्थापनाकडून त्यावर काहीच कारवाई होत नाही.

८ ई. योग्य कृती मान्य न करता सूडापोटी रुग्णाच्या जीविताला हानी पोचवणार्‍या माणुसकीहीन परिचारिका : पहारा करणार्‍या मुलीने मला सांगितले की, येथील परिचारिका फार वाईट आहेत. इथे असतांना त्यांच्याशी आपण अधिक शहाणपणा करायचा नाही. तसे केले, तर त्याचे परिणाम आपल्या रुग्णाला भोगावे लागतात. रुग्णाला इंजेक्शन देतांना इजा करणे, गोळ्या-औषधे वेळेत न देणे अथवा चुकीची देणे, रुग्णाला काही त्रास झाल्यास त्याला साहाय्य न करणे, आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) न बोलावणे अशा प्रकारच्या कृतींतून त्या रुग्णाला त्रास देतात, म्हणजे आपली एखादी कृती योग्य असूनही ती मान्य करण्याची सिद्धता नसल्याने केवळ सूडापोटी या परिचारिका रुग्णाच्या जीविताला हानी पोेचवू शकतात. (अशा माणुसकीहीन परिचारिका वैद्यकीय व्यवसायाला कलंकच आहेत ! – संकलक)

८ उ. सेवा न करताही वेतन मिळत असल्याने उद्दाम झालेल्या परिचारिका : रुग्णालयातील परिचारिकांना ६०-६५ सहस्र रुपये मासिक वेतन मिळते. फंड, एल्.आय.सी. इत्यादींची कपात होऊन प्रत्येक मासाला त्यांच्या हातात ५० सहस्र रुपये मिळतात. सेवा न करताही वेतन मिळत असल्याने या परिचारिका पाट्याटाकूपणे काम करतात आणि सर्वांशी उद्दामपणे वागतात. (रुग्णालयासारख्या ठिकाणी ही स्थिती, तर अन्य क्षेत्रांचा विचारच न केलेला बरा ! अशी उदाहरणे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवतात. – संकलक)

८ ऊ. रुग्ण महिलांची होणारी गैरसोय न दिसणारा डोळे असून आंधळा असलेला कर्मचारी वर्ग : बर्‍याच महिला रुग्णांसमवेत रुग्णालयात रहाण्यासाठी कुणी महिला नसल्याने रुग्ण महिलेचे वडील, भाऊ, विवाहित महिला असल्यास तिचा पती, दीर अथवा मुलगा असे कुणीतरी पुरुषच असतात. महिलांचा विभाग (वॉर्ड) असल्यामुळे पुरुषांना तेथील प्रसाधनगृहात जाता येत नाही. काही रुग्ण महिला एकट्याच असतात. अशा कारणांमुळे अनेक रुग्ण महिलांना स्वतःचे स्वतः सर्व करणे शक्य नसते. रुग्णालयातील कर्मचारी वर्ग कोणतेही साहाय्य करत नाही. त्यामुळे अशा रुग्ण महिलांची पुष्कळ गैरसोय होते. (हिंदु राष्ट्रात असे नसेल ! – संकलक)

८ ए. रुग्णांवर अकारण चिडचिड करणार्‍या परिचारिका : इंजेक्शन देतांना एखाद्या रुग्णाची लवकर नस सापडली नाही, तर वेळ देऊन, अन्य उपाय करून ती शोधण्याऐवजी रुग्णावरच चिडचिड केली जाते. नस सापडत नाही, यात त्या रुग्णाचा काय दोष ?

८ ऐे. इतरांचा विचार न करणारे आधुनिक वैद्य : आधुनिक वैद्य (डॉक्टर) रुग्णाला तपासायला येतात, तेव्हा आजूबाजूला अन्य रुग्ण आणि त्यांचे स्त्री-पुरुष नातेवाईक असतात. अशा वेळी पडदा लावून तपासायला हवे; मात्र असे केले जात नाही. तेथे दोन पडदे ठेवलेले असून तेही खूप मळके आणि फाटलेले आहेत.

९. रुग्णाच्या जीविताशी अत्यंत दायित्वशून्यपणे वागण्याची उदाहरणे

९ अ. साप चावलेल्या मुलीला असह्य वेदना होत असतांना काहीच न करणारी माणुसकीहीन परिचारिका ! : एका मुलीला साप चावला होता म्हणून तिला रुग्णालयात भरती केले होते. सकाळी तिची तपासणी झाली. रात्री साधारण १०.३० वाजण्याच्या सुमारास तिच्या पोटात खूप दुखायला लागले. वेदना असह्य झाल्याने ती पलंगावर अक्षरश: लोळत होती. तिच्या आईने त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या परिचारिकेला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘थोडा वेळ थांब. डॉक्टर येतील.’’ साधारण त्या स्थितीत अर्धा घंटा होऊन गेला, तरी डॉक्टर आले नाहीत. मुलीच्या वेदना वाढतच होत्या. शेवटी न रहावून मी परिचारिकेकडे गेले. तेव्हाही तिने मला ‘मी डॉक्टरांना कळवले आहे, ते येतील’, असे अगदी शांतपणे सांगितले; पण तिने उठून मुलीला पहाण्याचे कष्टही घेतले नाहीत. मी पुन्हा तिला डॉक्टरांना बोलावण्याविषयी आणि मुलीला वेदनाशामक औषध देण्याविषयी सांगितल्यावर परिचारिकेने रागाने माझ्यासमोर डॉक्टरांना दूरभाष लावला आणि ती लगेच माझ्यासोबत त्या मुलीला तपासायला आली.

९ आ. सलाईन बंद करण्यास रुग्ण महिलेच्या आईलाच सांगणारी दायित्वशून्य परिचारिका ! : एका महिलेचा गर्भपात झाला होता. तिला सलाईन लावले होते. सलाईन संपत आल्याचे पाहून रुग्ण महिलेच्या आईने परिचारिकेला त्याविषयी सांगितले. परिचारिकेने तिलाच ते बंद करण्यास सांगितले. आईला ते बंद कसे करायचे, हे ठाऊक नव्हते. तरीही तिने ते बंद करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सलाईनच्या बाटलीत रक्त चढले. ते पाहून तिने पुन्हा परिचारिकेला सांगितले. तेव्हा येऊन परिचारिकेने सलाईन बंद केले. (सर्वसामान्यांना प्रत्येक क्षेत्रातील माहिती नसते, म्हणून तर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्यकता असते. जनतेच्या जिवाशी खेळणार्‍या अशा माणुसकीहीन व्यक्तींना कामावरून दूर करायला हवे. – संकलक)

९ इ. रुग्णाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील आणि दायित्वशून्य आधुनिक वैद्य अन् परिचारिका ! : प्रसुतीनंतर एका महिलेच्या पोटात दुखायला लागले. तिने आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना सांगितले; परंतु त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. रुग्ण महिलेचे पोट खूप फुगले होते. ते पाहून शिकाऊ डॉक्टरांनी तिला ‘वायूमुळे (गॅस) होत आहे’, असे सांगितले. अशा स्थितीत १५ दिवस गेले. त्यानंतर रुग्ण महिलेने पुन्हा ‘दुखणे असह्य होत असून ते वायूमुळे नसावे’, असे सांगितले. त्या वेळी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी उपचार करायला आरंभ केला असता रुग्ण महिलेच्या पोटात पाणी साठल्याचे लक्षात आले. त्या वेळी अनुमाने ३ लिटर पाणी तिच्या पोटातून काढले असावे !

९ ई. रुग्णांची स्थिती समजून न घेणारी आणि रुग्णांवरच रागावणारी दायित्वशून्य आणि संवेदनशून्य परिचारिका ! : एका महिला ‘पाय खूप दुखतात, काहीच करता येत नाही’, असे सांगत रुग्णालयात भरती झाली होती. तिला चालवत नव्हते. अशा स्थितीत परिचारिका तिचे नाव जोराने पुकारून तिला औषधे घेऊन जाण्यास सांगत होती. खरे पहाता रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांच्या जवळ जाऊन परिचारिकेने त्यांना औषधे देण्याची कार्यपद्धत आहे; मात्र तसे होतांना दिसत नव्हते. त्या महिलेने आपली स्थिती नसल्याचे परिचारिकेला सांगितल्यावर परिचारिकेला राग आला आणि रागाने बडबडत येऊन महिलेला औषध देऊन गेली. महिलेने पाय दुखण्याचे कारण परिचारिकेला विचारले, तेव्हा समजावून सांगण्याऐवजी परिचारिका रागाने तिला म्हणाली, ‘तुझ्याच शरिरात साखरेचे प्रमाण कमी झाले आहे, त्याला आम्ही काय करणार ?’ यातून परिचारिकेची दायित्वशून्यता आणि संवेदनशून्यताच दिसते !

९ उ. रोग कोणता, हे समजून न घेताच रुग्णांवर उपचार करणारे शिकाऊ आधुनिक वैद्य ! : एक वयस्कर महिला रुग्ण भरती झाली होती. तिला डोळ्यांचा काहीच त्रास नव्हता. तिला स्पष्ट दिसत होते. असे असतांना एक शिकाऊ महिला डॉक्टर येऊन तिचे डोळे तपासू लागली. वयोमानामुळे त्या महिलेला खूप वेळ डोळे उघडे ठेवणे शक्य होत नव्हते. याचा विचार न करताच ती डॉक्टर रुग्ण महिलेवरच ओरडत होती. डोळ्यावर पडणार्‍या विजेरीच्या प्रकाशामुळे सलग १-२ मिनिटे डोळे उघडे ठेवणे किंवा एकाच ठिकाणी पहाणे रुग्ण महिलेला शक्य होत नव्हते. तेव्हाही शिकाऊ डॉक्टर रुग्ण महिलेला ओरडून सांगत होती की, मीच किती वेळा प्रयत्न करायचा ? तुला डोळे उघडे ठेवून एके ठिकाणी बघायला काय होते? नंतर त्या महिलेच्या डोळ्यांत शिकाऊ महिला डॉक्टरने औषध घातले आणि ती निघून गेली; पण नंतर तिचे डोळे जळजळायला लागले आणि दिवसभर तिला अंधुक दिसत होते.

९ ऊ. रुग्णाला होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करणारा माणुसकीहीन कर्मचारी वर्ग : एका ७०-७२ वर्षे वय असलेल्या महिलेला रक्त देत होते. तेव्हा तिला एकाच स्थितीत झोपून खूप त्रास होत होता. त्यामुळे ती सारखी ओरडत होती आणि हाताची सुई काढण्याविषयी सांगत होती; परंतु तिचे कोणीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्या वृद्धेला लघवीला जायचे होते, तरीही तिच्या हाताची सुई काढली नाही अथवा पर्यायी व्यवस्था केली नाही. नाइलाजास्तव त्या वृद्धेने झोपलेल्या ठिकाणीच लघवी केली. तिच्या अंगावरील कपडे, पलंगपोस, गादी सगळेच ओले झाले, तरीही कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही. तिलाच ‘थोडा वेळ थांब’, असे सांगत होते. प्रत्यक्षात २-३ घंट्यांपासून रक्त देणे चालू होते. (सलाईन देतांना गतीने दिले जाते; परंतु रक्त देतांना काळजीपूर्वक द्यावे लागते. त्यामुळे त्याची गती एका मिनिटात साधारण ७-८ थेंब एवढी कमी असते.) त्रास असह्य झाल्याने वृद्ध महिलेने कंटाळून दुसर्‍या हाताने सुई ओढून काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे तेथील परिचारिकेने येऊन काही वेळासाठी रक्त द्यायचे थांबवले.

९ ए. ‘परिचारिका’ या नावाला काळिमा फासणारे वर्तन करणार्‍या परिचारिका : वरील सर्व विदारक स्थिती आणि परिचारिकांचे रुग्णांशी अत्यंत चुकीचे वागणे पाहून अनेक रुग्ण अन् त्यांच्या समवेत आलेल्या व्यक्तींना वाटते की, या खरेच परिचारिका (रुग्णांच्या सेविका) आहेत कि वैरिणी ? कोणत्या जन्माचा त्या आपल्यावर सूड उगवत आहेत ?

९ ऐ. कुणालाही दाद न देणार्‍या आणि मन मेलेले असलेल्या परिचारिका ! : येथील परिचारिकांकडे पाहून वाटते की, यांचे हृदय पाषाणाचे आहे; परंतु पाषाणालाही पाझर फुटतो ! यांच्यावर मात्र काहीच परिणाम होत नाही, इतके त्यांचे मन मेलेले आहे. त्या इतक्या निगरगट्ट झाल्या आहेत की, त्यामुळे त्या कुणालाच दाद देत नाहीत आणि त्यांच्यावर कुणाचा अंकुशही नाही.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– एक साधिका (६.४.२०१६)

आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस कळवा.

स्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org