ऑनलाईन कार्यक्रम असूनही श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांची झाली भावजागृती !
पुणे येथे श्रीरामनवमीनिमित्त वाचक आणि धर्मप्रेमी यांसाठी ऑनलाईन श्रीराम जन्मोत्सव सत्संगाचे आयोजन !
पुणे – श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम नामजप सप्ताह अंतर्गत वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी २१ एप्रिल या दिवशी जन्मोत्सव सत्संगाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. प्रभु श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करून सत्संगाची सुरुवात झाली. यानंतर हडपसर येथील साधिका सौ. रीमा नान्नीकर यांनी प्रभु श्रीरामाची मानसपूजा भावपूर्णरित्या घेतली. त्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकवला. उपस्थित धर्मप्रेमींना मानस पूजा, आरती आणि पाळणा चालू असतांना अनेक अनुभूती आल्या. श्रीरामाच्या मंदिरात न जाताही श्रीरामाचे अस्तित्व अनुभवता आले तसेच भाव जागृत झाला. जिल्ह्यातील विविध धर्मशिक्षणवर्गात येणारे १६६ वाचक आणि धर्मप्रेमी यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली.
वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. सौ. संपदा लावंड, हडपसर – श्रीरामाची आरती आणि पाळणा म्हणतांना भरजरी वस्त्र परिधान करून अयोध्येमध्ये श्रीराम जन्मसोहळ्यात सहभागी झाल्याचे जाणवले. लहानपणी गावी हा सोहळा नियमित पाहिला आहे. १२ वाजता फुले उधळून जन्मसोहळा साजरा करतांना पाळण्याची दोरी हातात आहे, असे जाणवून चैतन्य मिळाले. घरी राहूनही या सर्व गोष्टी भावपूर्ण करता आल्यामुळे सार्थक वाटले.
२. वैष्णवी देशपांडे, विमाननगर – पाळणा चालू असतांना भावजागृती होऊन भावाश्रू आले.
३. सौ. ज्योती धाडी, धर्मप्रेमी – आरतीमधील प्रत्येक शब्द आर्ततेने भगवंताला अर्पण होत आहेत, असे वाटले. मानसपूजेमध्ये अयोध्या अनुभवून भगवंताच्या पाळण्याची दोरी हातात धरून जोजवत असल्याची अनुभूती आली.
४. सौ प्राची विधाते, हडपसर – पाळणा चालू असतांना भावजागृती झाली. तसेच लहान बाळ दिसले आणि त्याने मखमली पितांबर परिधान केले आहे, असे जाणवले. ते बाळ सगळ्यांकडे बघत असून त्याच्या पायामध्ये तांब्याचा कडा असावा, असे दिसले. पाळणा हलवावा असे वाटत होते; पण तो हलवला जात नव्हता आणि थोड्या वेळाने परमपूज्य डॉक्टर आठवले श्रीरामाच्या अवतारामध्ये दिसले. त्यांचे पूर्ण शरीर न दिसता फक्त दंडापर्यंतचा भाग दिसला.
विशेषआरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांना प्रसन्न वाटले, तसेच मानसपूजा करतांना अनेकांची भावजागृती झाली. केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |