पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी नवीन रुग्णांना रुग्णालयात प्रवेश बंद !
पुणे – सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे. याचा फटका नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. अनेक छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना दुसरीकडे हलवण्याच्या सूचना त्यांच्या नातेवाइकांना केल्या आहेत. त्यामुळे नातेवाइकांची पळापळ चालू आहे. परिणामी अनेक रुग्णालयांनी विजेवर चालणार्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर चालू केला आहे; पण वीज गेल्यास ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावला तर नातेवाईक डॉक्टरांवर आक्रमण करतील, अशी भीती डॉक्टरांना वाटत आहे.