दीड लाख रुपये देऊन रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये खाट उपलब्ध !
ठाणे येथील ग्लोबल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार !रुग्णांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्या रुग्णालय प्रशासनाला याविषयी खडसवायला हवे ! |
ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेने कोरोनाच्या रुग्णांसाठी सिद्ध केलेल्या ग्लोबल रुग्णालयातील अतीदक्षता विभागामध्ये वडिलांना भरती करण्यासाठी प्रवीण बाबर या तरुणाकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने प्रवीण यांचे वडील दिलीप बाबर यांना रुग्णालयात भरती करायचे होते; पण खाट उपलब्ध होत नव्हती. त्यांना घेऊन निघालेल्या शेख नामक रुग्णवाहिका चालकाने ‘दीड लाख रुपये भरल्यास ग्लोबल रुग्णालयात खाट उपलब्ध होऊ शकते’, असे सांगितले. पैसे मिळाल्यावर अर्ध्या घंट्यात खाट उपलब्ध झाल्याचे बाबर यांनी सांगितले.
मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा प्रकार अतिरिक्त आयुक्त देशमुख यांना सांगितला. त्यावर ‘अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि पैसे घेतांना कुणी आढळून आले, तर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल’, असे देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे जाधव यांनी सांगितले.