श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
१. खरे गुरुस्मरण
‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सर्व पृथ्वीलाच घर बनवण्याचे ध्येय दिले आहे. आता सर्व विश्व हाच आमचा संसार आहे. गुरूंच्या कृपेने आता आम्हाला वेगळे घर आणि नातेवाईक राहिले नाहीत.
३. आपले बोलणे असे असावे की, जे दुसर्याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल !
प्रत्येकाचा आनंद शोधून त्याच्याच भाषेत साधनेला धरून त्याच्याशी बोलायला हवे. यालाच ‘प्रकृतीशी जुळवून घेणे’, असे म्हणतात. त्यामुळे समोरच्याशी पटकन जवळीक साधता येते आणि संबंधित कार्याची फलनिष्पत्तीही वाढते. ‘दुसर्याला काय सांगायचे आहे ?’, हे मनाशी ठरवून त्याला चूक जरी सांगायची असली, तरी ती अशा पद्धतीने सांगावी की, त्याला ती कळली पाहिजे आणि पुढची सेवा करण्यास ती प्रेरणादायीही ठरली पाहिजे. आपले बोलणे असे असावे की, ते दुसर्याला साधनेत प्रोत्साहन देऊन गुरुसेवेत पुढे नेईल. यालाच ‘उत्तम बोलणे’ असे म्हणतात.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (४.५.२०२०)