दळणवळण बंदीच्या काळात साधक, धर्मप्रेमी आणि बालसाधक यांच्यात व्यष्टी साधनेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्तरांवर केलेले प्रयत्न अन् त्यामुळे झालेले लाभ !
‘दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) पूर्वी जिल्ह्यांतील सर्व साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा आठवड्यातून एकदा व्हायचा. आढाव्यात आढावासेवक ‘चिंतन सारणीप्रमाणे प्रयत्न केले का ?’, याविषयी साधकांना विचारायचे. एका आठवड्याच्या अंतराने होत असलेल्या आढाव्यांविषयी साधक गंभीर नसायचे. आढाव्यात सूत्रे सांगायची आहेत; म्हणून साधकांचे प्रयत्न व्हायचे. त्यामुळे साधकांचे स्वभावदोष न्यून होण्याचे प्रमाणही अल्प होते. दळणवळण बंदीच्या काळात साधकांना वेळ असल्याने पुढील प्रयत्न चालू केले आणि साधकांना त्याचा लाभही झाला.
१. साधकांना व्यष्टी साधनेची गोडी लागावी, यासाठी केलेले प्रयत्न
१ अ. दळणवळण बंदीच्या काळात साधकांचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेणे चालू केल्यावर साधकांना आढाव्याची गोडी लागून त्यांचे प्रयत्न वाढणे : दळणवळण बंदीच्या काळात साधकांना वेळ असल्याने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी प्रतिदिन साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याचे नियोजन केले आणि साधकांना त्याचा लाभ होऊ लागला. मी विदर्भातील साधकांची मते जाणून घेतली आणि त्यांचा आढावाही प्रतिदिन घेण्याचे नियोजन केले. आढावा घेणार्या साधकांची बैठक घेऊन केंद्रनिहाय गट बनवले. प्रत्येक गटाची सोयीची वेळ ठरवून चिंतन सारणीनुसार प्रतिदिन आढावे चालू केले. त्यामुळे साधकांना आढाव्याची गोडी लागली आणि त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले.
१ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांमध्ये व्यष्टी साधनेची गोडी निर्माण होण्याविषयी गटसेवकांना मार्गदर्शन करणे आणि त्यानुसार साधकांचा आढावा घेणे : काही दिवसांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा कसा घेतला, तर साधकांमध्ये व्यष्टी साधनेची गोडी निर्माण होईल, यासाठी ते देवद आश्रमात करत असलेले प्रयत्न’ याविषयी दोन टप्प्यांत गटसेवकांना मार्गदर्शन केले. त्यानुसार प्रतिदिन घेण्यात येणार्या आढाव्यांत टप्प्याटप्प्याने दोन किंवा तीन आठवड्यांनंतर नवीन सूत्रे अंतर्भूत केली.
१ आ १. पहिला टप्पा : साधकांनी आढाव्याला येण्यापूर्वी ‘आवरण काढणे, पाच मिनिटे नामजप करणे आणि एक लहानसा भावप्रयोग करणे, दिवसभरात चालता-बोलता किती नामजप झाला ? तसेच ही प्रक्रिया आनंददायी आहे’, हे मनाला सूचनेच्या माध्यमातून सांगणे.
१ आ २. दुसरा टप्पा : ‘स्वतःसाठी प्रत्येक सूत्राचे ध्येय घेणे आणि त्यानुसार प्रयत्न करणे, व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणार्यांना प्रोत्साहन देणे, त्यांनी केलेेले प्रयत्न आढाव्यातील सर्व साधकांना सांगायला सांगणे, भावजागृतीसाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न सांगणे’, असे नियोजन केले.
१ आ ३. तिसरा टप्पा : या टप्प्यात दैनिक ‘सनातन प्रभात’मधील एखाद्या साधकाच्या व्यष्टी साधनेविषयी आलेल्या लेखाचे चिंतन करून ते आढाव्यात सांगणे आणि इतरांना त्यातून काय शिकायला मिळाले ?’, ते विचारणे.
साधकांनी असे प्रयत्न करायला आरंभ केला. याचा परिणाम म्हणून त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढले अन् त्यांची भावजागृतीही होऊ लागली.
१ इ. दिनविशेषानुसार प्रतिदिन आढाव्यात स्वतःचे नियोजन करण्यास सांगणे : उत्तरप्रदेशातील साधकांनी त्यांच्या दैनंदिन आढाव्यात दिनविशेषानुसार स्वतःचे प्रतिदिनचे नियोजन करण्यास आरंभ केला. त्यानुसार विदर्भातही तसे प्रयत्न करण्यात येऊ लागले, उदा. पुढील आठवड्यात असलेला सण किंवा राष्ट्रपुरुष किंवा संत यांची जयंती वा पुण्यतिथी यांची नोंद ठेवून जिल्ह्यात त्याचे नियोजन करणे. धर्मप्रेमींच्या धर्मशिक्षणवर्गात त्या आठवड्यातील सर्व दिवसांचे महत्त्व सांगितले जाऊ लागल्याने त्यांना संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याचा परिचय होऊ लागला.
२. साधनेपासून दूर गेलेल्या जुन्या साधकांसाठी सत्संग चालू करून त्यांना दैनंदिन आढावा गटात जोडल्यामुळे त्यांचे साधनेचे प्रयत्न चालू होणे
जिल्ह्यांत काही जुने साधक काही कारणांनी साधनेपासून दूर गेले होते; पण त्यांची सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील श्रद्धा न्यून झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा सत्संग चालू केला. त्यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगितल्यावर हळूहळू त्यांचे प्रयत्न चालू झाले. नंतर त्यांना दैनंदिन आढावा गटात जोडल्यामुळे त्यांचे प्रयत्न वाढले.
३. धर्मप्रेमींसाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करून वर्गात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येऊ लागणे
समाजातील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, सनातनचे हितचिंतक, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार, तसेच हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते, अशा सर्वांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. त्यानंतर त्यांच्यासाठी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे नियोजन केले. या वर्गात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येऊ लागल्यामुळे त्यांचेही या दिशेने प्रयत्न व्हायला लागले.
४. बालसाधकांचे आढावे चालू करणे
मुलांना शाळेला सुटी असल्याने साधकांच्या मुलांनीही नामजप आणि अन्य उपाय करायला आरंभ केला. त्या वेळी या बालसाधकांचे आढावे घेण्याचे नियोजन केले. अजूनही त्यांंचे चिंतनसारणीप्रमाणे आढावे चालू आहेत.’
गुरुमाऊलीने सुचवलेली प्रसारातील ही काही सूत्रे त्यांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’
– (पू.) श्री. अशोक पात्रीकर, अमरावती (२३.१२.२०२०)
साधिकेने तिला होणार्या तीव्र आध्यात्मिक त्रासावर उपाय म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर बसून नामजप करणे आणि त्रासाचे प्रमाण वाढल्यास त्यावर मात करण्यासाठी संतांना भ्रमणभाष करणे‘नागपूरच्या एका साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्रासावर उपाय म्हणून त्या त्यांच्या देवघरात परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर बसून नामजप करतात. एखाद्या वेळी त्रासाचे प्रमाण वाढले, तर त्या मला किंवा सद्गुरु जाधवकाकांना भ्रमणभाष करतात. आम्ही त्यांना नामजप करायला सांगतो. नंतर त्या साधिकेचा त्रास न्यून झाल्यावर ‘भ्रमणभाषवर बोलण्याच्या माध्यमातून मी आध्यात्मिक त्रासावर मात करायचा प्रयत्न करते’, असे त्या आवर्जून सांगतात.’ |