संभाजीनगर येथे ३० एप्रिलनंतर लस न घेणार्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा महापालिकेचा विचार !
संभाजीनगर – कोरोनावर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच महापालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोहीम हाती घेत ११५ प्रभागांत लसीकरण चालू केले आहे. ३० एप्रिलनंतर लस न घेणार्या ४५ वर्षांवरील नागरिकांवर कारवाई होणार आहे. ‘लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा, अन्यथा ५०० रुपये दंड भरा’, अशा कारवाईचा विचार केला जात असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अल्प होत असली, तरी ग्रामीण भागातून उपचारासाठी भरती होत असलेल्या रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक व्हेन्टिलेटर, आयसीयू, ऑक्सिजन आणि खाट मिळवण्यासाठी धडपडत आहेत. शहरात आतापर्यंत १ लाख ९० सहस्र नागरिकांचे लसीकरण झाले. शहरात सरकारी आणि खासगी मिळून ४३ केंद्रांत लसीकरण केले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण करण्याचा मानस आहे; परंतु या वयोगटांतील नागरिकांनी लसीकरण करून घेतले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.