रामभक्तशिरोमणी भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
‘मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात भारतात दळणवळण बंदी असतांना दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित झाल्या होत्या. या भीषण आपत्काळातही प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अन् त्यांच्या भक्तांच्या चरित्रातील प्रसंग आणि त्यांच्या लीला पाहून अनेकांना मन:शांती लाभली अन् कोरोनाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळही मिळाले. त्यामुळे हिंदु धर्मातील ग्रंथांमध्ये अध्यात्मशास्त्र असल्यामुळे ते कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यामुळे त्यांचे पुन:पुन्हा पारायण केल्याने आत्मानंद आणि आत्मशांती यांची आजही अनुभूती येते. प्रभु श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार होते. कौसल्येचे प्रभु श्रीराम, कैकयीचे भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण अन् शत्रुघ्न अशी ही चार भावंडे दशरथ राजाचे सुपुत्र होतेे. ‘भरत’ हा प्रभु श्रीरामाचा अनुज होता. प्रभु श्रीरामाचे अनेक भक्त होऊन गेले. या लेखामध्ये आपण रामभक्त भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पाहूया आणि ‘भरतासारखी निस्सीम रामभक्ती आमच्या हृदयात निर्माण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.
१. पराकोटीचे वैराग्य
कैकयीने दशरथ राजाकडे दोन वचने मागितली होती. पहिले वचन म्हणजे श्रीरामाच्या ऐवजी भरताचा राज्याभिषेक करणे आणि दुसरे वचन म्हणजे श्रीरामाला १४ वर्षांच्या वनवासाला पाठवणे. सध्याचे राजकारणी राज्यपद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. येथे तर भरताला न मागता अयोध्येचे राज्यपद प्राप्त झाले होते. तो अयोध्येचा एकछत्र सम्राट झाला असता; परंतु त्याने राज्यपदाचा स्वीकार केला नाही. ‘राज्यपद सांभाळण्यासाठी सर्वदृष्टीने सक्षम असूनही त्याचा मोह नसणे’, हे पराकोटीच्या वैराग्याचे लक्षण आहे. असे वैराग्य देवतांकडेही नसते. ‘इंद्रदेवाच्या मनात इंद्रपदाचा किती हव्यास आणि लालसा असते’, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे ‘राज्यपद नाकारणार्या भरताचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ! ’, याचा अनुमान आपण यावरून लावू शकतो.
२. स्वत:ला प्रभु श्रीरामाचा दास म्हणवून घेणे
‘भरत’ हा जरी रघुवंशातील राजपुत्र आणि प्रभु श्रीरामांचा अनुज असला, तरी तो स्वत:ला ‘मी प्रभु श्रीरामाचा तुच्छ दास आहे’, असे संबोधत होता; कारण तो प्रभु श्रीरामांना स्वत:च्या ज्येष्ठ बंधुपेक्षा भगवंत समजत होता. ‘भगवंत माझा स्वामी असून मी त्याची चरणसेवा करणारा सामान्य दास आहे’, असा भाव भरताच्या मनामध्ये प्रभु श्रीरामाप्रती होता. यावरून भरताच्या पराकोटीच्या दास्यभक्तीची साक्ष आपल्याला मिळते. या दास्यभक्तीमुळेच त्याने चित्रकूट येथे जाऊन प्रभु श्रीरामाला पुन्हा अयोध्येला येऊन राज्यकारभार सांभाळण्यासाठी विनवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रभु श्रीरामाने त्यास ‘मी १४ वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर अयोध्येला येऊन राज्यपद स्वीकारेन’, असे वचन दिले. तेव्हा प्रभूंच्या अनुपस्थितीत तो प्रभूंच्या ऐवजी त्यांच्या चरणपादुका सिंहासनावर स्थापन करून त्यांचा दास बनून राज्यकारभार चालवणार असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या दास्यभक्तीपुढे आणि प्रेमळ हट्टापुढे प्रभु श्रीरामालाही हार पत्करून स्वत:च्या पादुका भरताला द्याव्या लागल्या. त्यानंतर भरताने त्या श्रीरामाच्या पादुका अत्यंत कृतज्ञताभावाने उचलून आपल्या डोक्यावर धारण केल्या आणि चित्रकुटातून अनवाणी चालत अयोध्येला घेऊन आला अन् त्याने राज्यसिंहासनावर प्रभूंच्या चरणपादुकांची विधीवत स्थापना केली. भरताच्या या निर्णयातून त्याच्या अंत:करणात प्रभु श्रीरामाप्रती ओतप्रोत भरलेला निस्सीम आदरभाव आणि स्वामीभाव दिसून येतो. आपण ‘दास्यभक्ती’ या विषयी ऐकतो; परंतु भरताने त्याच्या कृती, विचार आणि वृत्ती यांतून दास्यभक्तीचे मूर्तीमंत उदाहरणच सर्वांपुढे सादर केले आहे.
३. हिंदु धर्मशास्त्राचे कठोर पालन करणे
चित्रकूट येथे पोचल्यानंतर प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांना राजा दशरथाच्या देहत्यागाची वार्ता कळली. तेव्हा त्यांना शोक झाला. कुलगुरु वसिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनी मंदाकिनी नदीमध्ये दशरथ राजाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तर्पणविधी केले. त्याचप्रमाणे प्रभु श्रीरामाच्या वतीने अयोध्येचे राज्य सांभाळत असतांना भरताने कडक ब्रह्मचर्याचे पालन होण्यासाठी तपस्वी वेश धारण करून राजमहालाचा आणि राजसी सुखांचा त्याग केला अन् ‘नंदीग्राम’ या ठिकाणी जाऊन एक कुटी बांधून तपस्वी जीवन जगू लागला. त्याने १४ वर्षे तपस्वी जीवन व्यतीत करून एका आदर्श राजाची सर्व कर्तव्ये पार पाडली. त्याने खर्या अर्थाने ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या धर्माच्या चार पुरुषार्थांनुसार शुद्ध आचरण आणि कठोर धर्माचरण केले. त्यामुळे भरतही जनक राजाप्रमाणे राजर्षीच होता.
४. प्रभु श्रीरामाच्या आज्ञेेचे तंतोतंत पालन करून आदर्श राज्य करणे
जेव्हा प्रभु श्रीरामाने भरताला सांगितले की, त्याने १४ वर्षे राज्य करावे, तेव्हा भरत त्यांना म्हणाला, ‘‘मी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने लहान आहे. मला एवढ्या मोठ्या राज्याचे उत्तरदायित्व कसे पेलणार ?’’ तेव्हा प्रभु श्रीराम म्हणाले, ‘‘तू राजगुरु आणि कुलगुरु वसिष्ठ ऋषी, सुमंतांसारखे मंत्री आणि पितृतुल्य असणारे राजर्षी जनकराजा यांचे मार्गदर्शन घेऊन राज्यकारभार चालव.’’ त्याप्रमाणे भरताने संबंधितांचे मार्गदर्शन घेऊन आणि धर्मशास्त्रानुसार कठोर आचरण करून आदर्श राज्य चालवले. भरताने त्याच्या हृदयसिंहासनावर प्रभु श्रीरामांच्या पादुकांची स्थापना केल्यामुळे त्याचे सर्वांग आणि त्याचे अस्तित्व राममय झाले होते. अशा राममय झालेल्या भरताने केलेले राज्य हे साक्षात् रामराज्यच होते. त्याच्या राज्यात कुणीच दु:खीकष्टी नव्हते. त्याने पितृवत वात्सल्याने प्रजेचा पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केला होता.
५. वसिष्ठ ऋषींनी भरताचे केलेले गुणगान
भरताने राज्यपद, राजवैभव आणि राजसी सुख यांचा त्याग करून मोठे कार्य केले. त्यामुळे तो सर्वसामान्य मनुष्य न रहाता ‘महात्मा भरत’ झालेला आहे. त्यामुळे प्रभु श्रीरामाच्या पूर्वी भरताचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांत कोरले जाईल. भरताचे अंत:करण निष्कपट, नि:स्वार्थी आणि निर्मळ होते. रामभक्तीचा आदर्श सांगतांना भरताचा आवर्जून उल्लेख केला जाईल आणि भरताला केलेले नमन प्रभु श्रीरामापर्यंत निश्चितपणे पोचेल’, असे गौरवोद्गार वसिष्ठ ऋषींनी भरताविषयी काढले.
६. जेव्हा भरताने प्रभु श्रीरामाच्या चरणपादुका मस्तकी धारण केल्या, तेव्हा ब्रह्मांडातील ऋषिमुनी आणि देवता यांनी आशीर्वाद देत भरतावर पुष्पवृष्टी करणे
भरत प्रभु श्रीरामापासून शरिराने भले दूर असला, तरी तो मनाने सदैव प्रभूंच्या जवळच होता. तो अष्टौप्रहर प्रभु श्रीरामाचे भावस्मरण करत असे आणि त्यांच्या अनुसंधानात राहूनच राज्य चालवत असे. भरताच्या मनात प्रभूंच्या पादुका आणि त्याच्या मुखात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा त्यांचा पवित्र जप अखंड चालू होता. तो त्याच्या हृदयातील प्रभु श्रीरामांच्या चरणपादुकांची भावपूर्णरित्या मानस पूजा करत होता. त्यामुळे प्रभु श्रीरामाचे त्याच्या जवळ सूक्ष्मातून अखंड अस्तित्व कार्यरत होते. अशा राममय झालेल्या भक्तशिरोमणी महात्मा आणि राजर्षी भरताच्या चरणी कोटीशः वंदन. रामभक्त भरताच्या या परमोच्च भक्तीपुढे संपूर्ण ब्रह्मांडाचे ऐश्वर्य आणि समस्त पुण्यात्म्यांचे पुण्यही थिटे पडले. त्यामुळे भरताने जेव्हा चित्रकूट येथे प्रभु श्रीरामाच्या चरणपादुका स्वत:च्या मस्तकी धारण केल्या, तेव्हा ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये वास करणारे पुण्यात्मे, दिव्यात्मे, ऋषिमुनी, सिद्ध, यक्ष, गंधर्व आणि समस्त देवदेवता यांनी आनंदाने आशीर्वाद देत भरतावर पुष्पवृष्टी करून त्याचा सन्मान केला.
७. प्रभु श्रीरामाला दिलेल्या वचनाचे तंतोतंत पालन करणे
प्रभु श्रीरामाचा राज्य सांभाळण्याचा आदेश स्वीकारतांना भरताने सांगितले, ‘‘एका अटीवर मी हे राज्य सांभाळेन. जर १४ वर्षांचा कालखंड पूर्ण होताच तुम्ही अयोध्येत परतला, तर ठीक आहे. जर तुम्हाला अयोध्येत येण्यास विलंब झाला, तर मी अग्निप्रवेश करीन.’’ भरताने केलेली ही प्रतिज्ञा ऐकून सर्वजण आश्चर्यचकित आणि चिंताग्रस्त झाले. प्रभु श्रीरामाने त्याला १४ वर्षांनी अयोध्येत तात्काळ परत येणार असल्याचे वचन दिले. रावण वधानंतर १४ वर्षांचा कालावधी संपत असतांना प्रभु श्रीराम सीता, हनुमान आणि वानरविरांसह पुष्पक विमानात बसून लंकेहून भारतात परत येत होते. ‘अयोध्येला परतण्यास वेळ लागू शकतो; त्यामुळे भरताने अग्निप्रवेश करू नये’, यासाठी प्रभु श्रीरामाने त्यांच्या आगमनाची वार्ता सांगण्यासाठी हनुमानाला अयोध्येला जाण्यासाठी पुढे पाठवले. ठरलेला कालावधी संपत आल्याने आणि प्रभु श्रीराम परतण्याची कोणतीच चिन्हे न दिसल्याने भरत अग्निप्रवेश करणारच होता, इतक्यात प्रभु श्रीरामाचा संदेश घेऊन हनुमान तेथे पोचला. त्यामुळे भरताला अत्यंत आनंद होऊन त्याने अग्निप्रवेश करण्याचा निर्णय रहित केला आणि प्रभु श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजवली. भरतामध्ये प्रभु श्रीरामाप्रतीची भक्ती इतकी होती की, त्याने स्वत:चे सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण केले होते. त्याचबरोबर त्याला प्रभूंचा विरह सहन न झाल्याने तो प्राणांचाही त्याग करणार होता. यावरून ‘रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई । ’ या उक्तीची प्रचीती आली. क्षणाचाही विलंब न करता स्वत:चेे सर्वस्व भगवंताच्या चरणी हसतमुखाने अर्पण करणार्या रामभक्त भरताची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे. त्यानंतर जेव्हा प्रभु श्रीराम सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला पोचले, तेव्हा श्रीराम आणि भरत यांची भेट झाली. १४ वर्षांचा विरह संपून भक्त आणि भगवंत यांच्या भेटीचा हा अनमोल क्षण पहाण्यासाठी केवळ अयोध्यावासीच नव्हे, तर संपूर्ण सृष्टी आतूर झाली होती.
८. भरत मानसिक स्तरावर न रहाता आध्यात्मिक स्तरावरील अत्युच्च पातळीचे आदर्श जीवन जगणे
‘माता कैकयीने प्रभु श्रीरामाचा राज्याभिषेक करू दिला नाही आणि त्यांना वनवासात पाठवले’, याचे भरताला पुष्कळ दु:ख झाले; कारण भरत आणि प्रभु श्रीराम यांच्यामध्ये बंधुत्वाचे नाते नसून त्यांच्यामध्ये भक्त आणि भगवंत यांचे अतूट नाते होते. तो कैकयी मातेवर चिडला आणि तिचे तोंड न पहाण्याची त्याने प्रतिज्ञा केली. जेव्हा प्रभु श्रीराम १४ वर्षांनी पुन्हा अयोध्येत परतले, तेव्हा प्रभु श्रीरामाने भरताची समजूत काढल्यावर त्याने कैकयी मातेला क्षमा करून तिच्याशी बोलणे चालू केले. भरत आणि प्रभु श्रीराम हे व्यावहारिक नात्यानुसार सावत्र भाऊ होते; परंतु भरत आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे त्याला प्रभु श्रीरामाला साक्षात् भगवंत समजत असल्यामुळे ते त्याला स्वत:च्या प्राणांहूनही प्रिय होते. यावरून भरत कधीच मानसिक स्तरावर न रहाता आध्यात्मिक स्तरावर राहून अत्युच्च पातळीचे आदर्श जीवन जगत होता हे लक्षात येते.
९. भरताने आदर्श राज्य करून रामराज्य करणे
भरताला राजकारण आणि नीतीशास्त्र यांचेही ज्ञान होते. त्याने प्रभु श्रीरामांच्या अनुपस्थितीत त्याने स्थुलातून राज्यकारभार उत्कृष्टरित्या सांभाळला. त्याचे आचरण इतके शुद्ध होते की, प्रजा त्याच्यामध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिरूप पाहून श्रद्धेने आणि भक्तीभावाने धर्माचरण अन् साधना करत होती. भरताच्या उत्कृष्ट राज्यकारभारामुळे शत्रूने कधीही अयोध्येवर स्वारी केली नाही. त्याचप्रमाणे अयोध्येतील प्रजाही धर्माचरण करून आदर्श जीवन जगत असल्यामुळे कुणाच्याही जीवनात दु:ख नव्हते आणि राज्यावरही कोणतीच नैसर्गिक किंवा मानवी संकटे आली नाहीत. अशा प्रकारे भरताने आदर्श राज्य करून रामराज्यच केले.
१०. भरताला राज्याचा अजिबात मोह नसणे
जेव्हा प्रभु श्रीराम १४ वर्षांनंतर अयोध्येला परतले, तेव्हा भरताने अयोध्येचे राज्य त्यांना सोपवले. १४ वर्षे राज्यकारभार सांभाळूनही भरताला राज्याचा अजिबात मोह जडला नाही. त्याने निरपेक्ष आणि अलिप्त राहून केवळ स्वत:चे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या आज्ञेने अयोध्येचे राज्य सांभाळले होते. भरत निर्मोही असल्यामुळे तो राज्यकारभार करत असला, तरी राजवैभव किंवा राजसत्ता यांमध्ये अजिबात गुंतला नाही.
११. भरताने कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग या चारही योगमार्गांनुसार साधना करणे
रामभक्त भरतामध्ये अनेक दैवी गुणांचा समुच्चय होता. व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर भरताने सर्व कर्तव्ये पूर्ण करून आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श राजा आणि आदर्श भक्त या सर्वांची कर्तव्ये पूर्ण करून भरताने सर्वांपुढे कर्मयोगाचा आदर्श मांडला. भरतामध्ये प्रभु श्रीरामाप्रती निस्सीम दास्यभक्ती होती. त्यामुळे त्याची अंतर् साधना भक्तीयोगानुसार चालू होती. त्याचप्रमाणे भरताला हिंदु धर्मशास्त्र आणि अध्यात्म यांचे संपूर्ण ज्ञान होते. त्यामुळे त्याचे आचरण धर्मशास्त्राला अनुसरून होते. राज्यकारभारातून अवकाश मिळताच भरत प्रभु श्रीरामाचे स्मरण करून ध्यानधारणा करत असे. अशा प्रकारे भरताने कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग या चारही योगमार्गांनुसार साधना करून ‘आदर्श कर्मयोगी, परमज्ञानी, भक्तशिरोमणी आणि स्थितप्रज्ञ असणे’, या उच्चतम आध्यात्मिक अवस्था प्राप्त केल्या होत्या.
१२. भरत आणि प्रभु श्रीराम यांच्यातील एकरूपतेमुळे त्यांच्यात साम्य असणे
रामभक्त भरत प्रभु श्रीरामाशी इतका एकरूप झाला होता की, त्याची कांती प्रभु श्रीरामाप्रमाणे निळसर रंगाची दिसत होती. त्याचे नयन कमळाप्रमाणे सुंदर होते आणि त्याच्या देहातून चंदनाचा दैवी सुगंध दरवळत होता. रामभक्त भरताचे सौंदर्य दैवी आणि अलौकिक होते. प्रभु श्रीराम आणि भरत यांच्यामध्ये इतके साम्य निर्माण झाले होते की, प्रजेला भरताला पाहिल्यावर प्रभु श्रीरामांचे दर्शन घेतल्याचे समाधान लाभत असे; कारण भरत केवळ दिसायलाच प्रभु श्रीरामाप्रमाणे नव्हता, तर त्याच्या अंगी प्रभु श्रीरामाप्रमाणे दैवी गुणही होते. अशा प्रकारे ‘केवळ प्रभु श्रीरामच नव्हे, तर त्यांचे भरतासारखे समस्त भक्तही आदर्श होते’, हे वरील सूत्रांवरून आपल्याला लक्षात येते.
१३. कृतज्ञता !
‘देवाच्या असीम कृपेमुळे महात्मा भरतावर वरील लिखाण उत्स्फूर्तपणे सुचले. भगवंतानेच माझ्या मनातील विचार शब्दबद्ध करून घेतले. यासाठी प्रभु श्रीरामाच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२१)
भरतके रूप में रामदर्शन होई !चैत्र शुक्ल नवमी की शुभ तिथी आई । विष्णूजीकी गदा मनुष्यरूप में आई । रघुकुल रीती सदा चली आई । वन में गए श्रीराम, लक्ष्मण और सीतामाई । भरत के हृदय में बसे रघुराई । भरतसा ना दूजा त्यागी कोई । रामकाज में सदैव साजे । प्रभु श्रीरामसे भरत एकरूप होई । प्रभु सेवा में अति सुख पाई । महात्मा भरतसा न दूजा कोई । – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२१) |