६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सॅन डिएगो, अमेरिका येथील बालसाधिका कु. वैदेही जेरे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
१. श्रीकृष्णाप्रती भाव ठेऊन नामजप करतांना सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मांडीवर घेऊन गोष्ट सांगत लोणी भरवणे आणि त्या वेळी प्रत्यक्षात तोंडामध्ये लोण्याची चव जाणवणे
‘१९.१.२०२० या दिवशी मी नामजप करत बसले होते. त्या वेळी मी ‘श्रीकृष्ण माझ्या जवळ बसला आहे’, असा भाव ठेवला होता. थोड्या वेळाने मला मी बसलेली भूमी (जमीन) कुणाची तरी मांडी असल्यासारखी मऊ लागली. तेव्हा ‘मी श्रीकृष्णाच्या मांडीवर बसले आहे’, असे मला वाटले. तेव्हा ‘मी श्रीकृष्णाच्या मांडीवर बसले असून श्रीकृष्ण मला ‘कालियामर्दना’ची गोष्ट सांगत होता आणि मला लोणी भरवत होता’, असे मला जाणवत होते. माझा नामजप चालू असतांना मला प्रत्यक्षातही माझ्या तोंडामध्ये लोण्याची चव जाणवत होती. त्यानंतर ‘श्रीकृष्ण मला थोपटून झोपवत आहे आणि मी श्रीकृष्णाच्या मांडीवर झोपले आहेे’, असे मला वाटले. (१९.१.२०२०)
२. नामजप एकाग्रतेने होण्यासाठी भावप्रयोग केल्यावर एकाग्रता होऊन नामजप चांगला होणे
मी माझ्या आईसमवेत ऑनलाईन नामजपादी उपायांना बसले होते. माझा नामजप होत नव्हता; म्हणून मला आईने प्रार्थना करायला सांगितली. थोड्या वेळाने ‘नामजप एकाग्रतेने होत नसेल, तर भावप्रयोग करून बघ’, असे मला पूर्वी एकदा आईने सांगितले असल्याचे आठवले. तेव्हा ‘प्रत्येक नामजप माझ्या मनात जात आहे आणि माझ्या मनातील सर्व निरर्थक विचार पाण्याप्रमाणे वाहून जात आहेत’, असा भाव ठेवून मी भावप्रयोग केला. त्यानंतर मला नामजपावर एकाग्र होता येऊन माझा नामजपही चांगला झाला.’
– कु. वैदेही जेरे (वय १२ वर्षे), सॅन डिएगो, अमेरिका. (६.८.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |