उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा समुद्रकिनारपट्टीचा भाग कोरोना ‘अतीसंवेदनशील’ क्षेत्र ! – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल
पणजी, २२ एप्रिल (वार्ता.) – उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा समुद्रकिनारपट्टीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हे भाग कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील भाग आहेत, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘प्रिव्हेंटीव्ह आणि सोशल मेडिसीन’ विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. या भागात प्रतिदिन १३० ते १७९ कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडत असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे पार्ट्या आणि पर्यटन यांसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आहे. या ठिकाणी निर्बंध असूनही रात्री उशिरा पार्ट्या चालू आहेत, तसेच सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. कोरोनाबाधित रुग्ण, चाचणीसाठी आलेले रुग्ण आदींनी ‘आरोग्य सेतू’ अॅपवर नोंदवलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल सिद्ध केला आहे.
या अहवालाविषयी अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘गोव्यात कोरोनाविषयक स्थिती अत्यंत बिकट आहे, हे लोकांना समजावे यासाठी ही माहिती आम्ही सार्वजनिक करत आहोत. खाटांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि डॉक्टरवर्ग खूप तणावात काम करत आहेत. गोव्यातील कोरोनाबाधित ८० टक्के रुग्ण बार्देश, सासष्टी, तिसवाडी आणि फोंडा या तालुक्यांमध्ये आहेत.’’
कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता ! – आरोग्य खात्यातील तज्ञ डॉक्टरांचे मत
राज्यासाठी पुढील २ आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुढे आणखी विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील वरिष्ठ तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
वरिष्ठ तज्ञ डॉक्टर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जाणार आहे; मात्र रुग्णसंख्या वाढत जाण्याचे प्रमाण किती दिवस रहाते, हे पहावे लागेल. पुढील २ आठवड्यांत मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी निर्बंधांचे पालन न केल्यास आणि यावर शासनाने देखरेख न ठेवल्यास ही स्थिती आणखी खराब होऊ शकते. युवा वर्गात अधिक प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे; मात्र मृत पावलेले रुग्ण ६० ते ८० वर्षे वयोगटातील सर्वाधिक आहेत. एका कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास पूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. अजूनही लोक कोरोनाच्या दुसर्या लाटेकडे गांभीर्याने पहात नाहीत.’’