गुढीपाडव्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ४६६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन !
|
कोल्हापूर – गुढीपाडव्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. सनातन आणि समिती यांच्या वतीने ४६६ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांचा ५ सहस्र जिज्ञासूंनी लाभ घेतला, तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ पद्धतीने श्रीरामाच्या सामूहिक नामसत्संग सोहळ्याचे ३२७ ठिकाणी आयोजन करण्यात आले. या नामसत्संगांचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला. या निमित्ताने करण्यात आलेल्या धर्मप्रसाराच्या कार्यात ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी कृतीशील सहभाग नोंदवला.
गुढीपाडव्याचे शास्त्रीय महत्त्व हिंदूंना कळावे, यासाठी काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन प्रवचनांचे, तर काहींनी नामसत्संगांचे आयोजन केले होते. यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला. तसेच समाजाला गुढीपाडव्याची शास्त्रीय माहिती कळावी, यासाठी त्यांच्या परिसरातील फलकांवर लिखाण करणे, सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार करणे, अशा विविध सेवांमध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
धर्मप्रेमी, वाचक आणि जिज्ञासू यांनी केलेला वैशिष्ट्यपूर्ण धर्मप्रसार
- केर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथील धर्मप्रेमी श्री. सुनील गोळे यांनी त्यांचे नातेवाइक आणि परिचित यांना संपर्क करून ‘ऑनलाइन’ प्रवचनाचे आयोजन केले होते.
- निपाणी (कर्नाटक) येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिनंदन भोसले आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. संभाजी भोकरे यांनी गुढीपाडव्याचे पत्रक अन् ‘व्हिडिओ’ यांचा सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार केला. याद्वारे त्यांनी सहस्रो लोकांपर्यंत विषय पोचवला.
- गेल्या ३ वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढी उभारली जाते. यावर्षीही शिरोली (जिल्हा कोल्हापूर) आणि मत्तिवडे (कर्नाटक) येथील धर्मप्रेमींनी पुढाकार घेत अन् नियोजन करून सामूहिक गुढी उभी केली. या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
- कोल्हापूर येथील उद्योजक श्री. सचिन कुलकर्णी यांनी त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्यांसाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन केले. या प्रवचनामध्ये अनेक जिज्ञासू सहभागी झाले होते. श्री. सचिन कुलकर्णी यांनी स्वतःहून त्यांच्या संपर्कातील सर्वांना दूरभाष करून या प्रवचनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले.
- गुढीपाडव्याची शास्त्रीय माहिती देणारे पत्रक आणि ‘व्हिडिओ’ यांचा सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार करणे, प्रवचनांचे आयोजन करणे आदी सेवांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, ‘प्रोफाईल’ आणि ‘हेल्पलाईन’ मेंबर्स असे एकूण ४५ जण सहभागी झाले होते.
- सोलापूर येथील धर्मप्रेमींनी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्याच्या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यातील काही धर्मप्रेमींनी स्वतःहून प्रवचनाची प्रस्तावना सांगणे, वक्त्यांची ओळख करून देणे अशा सेवा केल्या. तसेच काही धर्मप्रेमींनी या प्रवचनांचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला.
गुढीपाडव्याचे प्रवचन ऐकल्यावर आमच्या मनातील सर्व अपसमज दूर झाले ! – युवतींचा अभिप्राय
नाशिक रस्ता (पुणे) येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी महिला सौ. रोहिणी नानेकर यांची नातलग कु. तनुजा म्हासळकर हिने तिच्या मैत्रिणींना गुढीपाडव्याचे शास्त्र ठाऊक व्हावे, यासाठी पुढाकार घेत ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन केले. या प्रवचनाच्या वेळी कु. म्हासळकर हिच्या मैत्रिणींनी गुढीपाडव्याची माहिती लिहून घेण्यासह कोणता नामजप करावा ? हेही विचारून घेतले. या प्रवचनानंतर मैत्रिणींनी सांगितले की, यापूर्वी आम्ही सर्व जण अपसमजामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी न उभारता भगवा झेंडा उभारत होतो; मात्र आजचे प्रवचन ऐकल्यावर आमच्या मनातील सर्व अपसमज दूर झाले. त्यामुळे आम्ही सर्वजण यावर्षी शास्त्राप्रमाणे गुढी उभारणार.
विशेष
|