नागपूर येथे रेमडेसिविर इंजेक्शन विकतांना वॉर्डबॉयसह तिघांना अटक !

कोरोनाचे संकट असतांना रुग्ण, नातेवाईक यांना साहाय्य न करता अधिक दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करून त्यांची लुबाडणूक करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांकडून ते पैसे वसूल करून घ्यावेत, तसेच त्यांना अधिक वेळ काम करण्याची शिक्षा द्यावी !

नागपूर – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या आणखी ३ आरोपींना शहरातील सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक आरोपी खासगी रुग्णालयात ‘वॉर्डबॉय’चे काम करतो. तो एका रुग्णाच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन ३० सहस्र रुपयांना विकणार असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून अटक केली. शुभम पानतावणे असे त्याचे नाव आहे, तर प्रणय येरपुढे आणि मनमोहन मदान अशी त्याच्या सहकार्‍यांची नावे आहेत. पानतावणे याच्याकडून २ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या संदर्भात १७ आरोपींवर गुन्हे नोंद झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आधुनिक वैद्य, परिचारिका, वॉर्डबॉय यांसह क्ष-किरण चाचणी तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.