हिंदूंचे धार्मिक मेळावे प्रदूषणास कारणीभूत ठरत नाहीत का ? – कर्नाटक उच्च न्यायालय
अवैधरित्या उभारण्यात आलेले क्रॉस हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !
अवैध बांधकामे आणि धार्मिक मेळाव्यातून होणारे प्रदूषण यासंदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट होतात, त्या वेळी न्यायालयाने केवळ या २ सूत्रांपुरता मर्यादित न रहाता अन्य पंथियांकडून धार्मिक मेळावे आयोजित करून हिंदूंचे केले जाणारे धर्मांतर किंवा धार्मिक मेळाव्यांच्या आडून अन्य काही अवैध कामे केली जात नाही ना, याकडे लक्ष घालून न्याय देणे हिंदूंना अपेक्षित आहे !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने चित्रदुर्ग येथील हिलॉक येथे अवैधरित्या बांधण्यात आलेले २ क्रॉस हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. बांधण्यात आलेले क्रॉस ही सार्वजनिक संपत्ती असल्याचे याचिकेत म्हटले होते. तसेच ‘या क्रॉसपुढे ख्रिस्ती मेळावे भरवल्याने प्रदूषण होते’, असे याचिकाकर्त्याने याचिकेत नमूद केले होते. याचिकाकर्त्याने, ‘अशा धार्मिक सभांमुळे धार्मिक तणावही निर्माण होतो’, असे म्हटले होते.
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले की, ही जनहित याचिका याचिकाकर्त्याच्या पूर्वग्रहदूषित प्रेरणेतून प्रविष्ट करण्यात आली आहे. उभारलेल्या क्रॉसमुळे प्रदूषण होण्यासाठी मेळावे कारणीभूत आहेत का ? आपण एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करत आहात. हिंदूंचे धार्मिक मेळावे प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरत नाहीत का ?
याचिकाकर्त्याने निवेदनात म्हटले आहे की, अवैधरित्या उभ्या केलेल्या क्रॉसमुळे परिसरात धार्मिक तणाव आणि प्रदूषण होईल. ‘येथे अनेक ठिकाणी विविध धर्म आणि पंथ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम झालेले आहे’, असे सांगून न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.