कर्नाटकातील प्रमुख मंदिरांसह अन्य मंदिरांच्या १७६ ठिकाणच्या भूमींवर भूमाफियांचे नियंत्रण !
अतिक्रमणाची चौकशी करून भूमी परत मिळवण्याचा सरकारचा आदेश
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण आणि नंतर मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण या दोन्ही गोष्टींपासून मंदिरांना मुक्त करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे, हे भाविकांनी लक्षात घ्यावे !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील प्रमुख देवालयांची असलेली कोट्यवधी रुपयांची भूमी माफियांच्या घशात गेली असल्याची माहिती उघड झाली आहे. या संदर्भात चौकशी करून देवालयाच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर मासाच्या अहवालानुसार १७६ ठिकाणच्या भूमींवर अतिक्रमण झाल्याचे उघडकीस आले असून धर्मादाय विभागाने देवळाच्या स्थावर संपत्तीच्या नोंदणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. भूमाफियांकडून भूमी परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासन पुढे सरसावले आहे. विभागाच्या अधिकार्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. महसूल खात्याच्या व्याप्तीत येणार्या भूमापन विभागाच्या साहाय्याने सर्वेक्षण करावे, असे सुचवण्यात आले आहे. सरकारी भूमी अतिक्रमणाच्या संदर्भात ए.टी. रामस्वामी आयोगाच्या अहवालात उल्लेख केलेल्या सूत्रांचा विचार करण्यात आला आहे. अतिक्रमण हटवण्यासह देवळाच्या संपत्तीचे जतन करण्यालाही प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
१. ऐतिहासिक, पारंपरिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जागृत देवता या कारणाने प्रसिद्ध असलेली ३६ सहस्र देवालये यांचा प्रभारी धर्मादाय विभाग आहे. सहस्रो एकर भूमी या देवस्थानांच्या मालकीची आहे. त्याचे मूल्य १० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अनुमान आहे.
२. धर्मादाय विभागाचे आयुक्त के.ए. दयानंद यांनी सांगितले की, धर्मादाय देवस्थानांच्या भूमीची मोजणी, नोंदणी, अतिक्रमणाचा छडा लावणे, हे कार्य प्रगतीपथावर असून पूर्ण अहवाल सिद्ध करण्यास वेळ देणे आवश्यक आहे. संबंधित जिल्हाधिकार्यांचे साहाय्य घेऊन शोधलेल्या भूमींवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्या श्रेणीतील देवस्थाने किती आहेत ?
वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेली देवस्थाने ए ग्रेड, ५ ते २५ लाख रुपये उत्पन्न असलेली देवस्थाने बी ग्रेड आणि ५ लाख किंवा त्यापेक्षा अल्प उत्पन्न असलेली देवस्थाने सी ग्रेड, अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या मानदंडाप्रमाणे ए ग्रेडचा निकष असणारी २०५, बी ग्रेड १३९ आणि सी ग्रेडचा निकष असणारी ३४ सहस्र २२० मंदिरे राज्यात आहेत.