कोरोना महामारीतून मुक्त होण्यासाठी मारुतिरायाची उपासना वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे ! – प.पू. दास महाराज
आपत्काळातून वाचण्यासाठी साधना, धर्माचरण आणि भगवंताची भक्ती करून कोरोना महामारीतून मुक्त होण्यासाठी मारुतिरायाची उपासना वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे ! – प.पू. दास महाराज
१. कोरोना महामारीचे महासंकट विक्राळ रूप घेऊन समस्त मानवजातीवर तुटून पडणे आणि दीड वर्ष उलटत आले, तरी विज्ञानाला या रोगावर अचूक औषध सापडलेले नसणे
‘कोरोना महामारीचे महासंकट विक्राळ रूप घेऊन समस्त मानवजातीवर तुटून पडले आहे. या महासंकटासमोर अगदी विज्ञानात सर्वोच्च स्थानावर असलेल्या अमेरिकेसारख्या देशांनीसुद्धा हात टेकले आहेत. जवळजवळ दीड वर्ष उलटत आले, तरी विज्ञानाला या महारोगावर अचूक औषध सापडलेले नाही. लसीमुळे या महारोगापासून काही प्रमाणात सुरक्षा मिळत असली, तरी औषध सापडलेले नाही.
२. कोरोना महामारीची ही निर्माण झालेली साखळी तोडण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात असूनही ती आटोक्यात न येणे
कोरोना लस घेतली, तरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) वापरणे आणि ‘सॅनिटायझर’चा वापर करणे, हाच या महामारीपासून वाचण्याचा मार्ग सध्यातरी संपूर्ण विश्वाने स्वीकारला आहे. महामारीची निर्माण झालेली ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी, कडक निर्बंध, वेगाने चाचण्या करून आणि रुग्णाला शोधून काढून त्याला घरात स्वतंत्र ठेवणे (क्वारंटाईन) किंवा तीव्रता बघून रुग्णालयातील स्वतंत्र विभागात (आयसोलेशन) भरती करणे आदी मार्ग अवलंबले जात आहेत, तरीही ही महामारी आटोक्यात येत नाही.
३. ‘कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी अध्यात्माविना पर्याय नाही’, हे सूत्र लक्षात घेणे आवश्यक असणे
जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्माचा आरंभ होतो. कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी अध्यात्माविना पर्याय नाही, हे सूत्र लक्षात घेणे आवश्यक आहे. हिंदु धर्माच्या पायावरच विज्ञानाचा डोलारा उभा आहे. पाश्चात्त्य जगात विज्ञानाचा जो विकास झाला, त्याला कारण भारतीय संस्कृती, अर्थात् हिंदूंचे धर्मग्रंथ हेच आहे. हिंदु धर्मातील ज्ञानामृत पिऊनच विज्ञान जिवंत आहे. अमेरिकेने अणूबॉम्बचा शोध लावला. त्याला महाभारतातील ज्ञानामृत मिळाले. परम संगणकाच्या निर्मितीसाठी श्रीमद्भगवतगीतेचे ज्ञानामृत मिळाले. तसेच कोरोना महामारीची साखळी तोडण्याचा मार्गही हिंदु धर्मग्रंथांमधूनच मिळेल, यात शंका नाही. ‘सध्या या पवित्र भारतभूमीतूनच कोरोनावर जगातील सर्वाधिक परिणामकारक लस सापडली आहे’, हे त्याचेच द्योतक आहे.
४. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेने त्या वेळी ३ दिवसांची टाळेबंदी करणे आणि तेव्हापासून देशावर महासंकट आल्यास टाळेबंदी करण्याची प्रथा पडणे
सध्या कोरोनामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. महामारीची साखळी तोडण्यासाठी रुग्ण सापडणार्या भागापुरती टाळेबंदी, संचारबंदी, कडक निर्बंध यांसारखे आत्मघातकी मार्ग अवलंबले जात आहेत. अमेरिकेने ही प्रथा ९/११ च्या आतंकवादी आक्रमणानंतर चालू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेने त्या वेळी तीन दिवसांची टाळेबंदी केली होती. तेव्हापासून देशावर महासंकट आल्यास काही दिवसांची टाळेबंदी करण्याची प्रथा पडली; पण वर्ष २०२० मध्ये ‘या प्रथेचा दुष्परिणाम किती आहे ?’, हे भारतियांनी अनुभवले आहे. अनेक व्यवसाय आणि उद्योग बंद पडले. अनेकांच्या नोकर्या गेल्या. संपूर्ण भारतावर आर्थिक संकट कोसळले आहे. म्हणूनच टाळेबंदी म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर म्हटल्यास वावगे ठरणारे नाही.
५. ‘हिंदु धर्मातील लहानसा आचारही मानवाला सुरक्षा देऊ शकतो’, हे अधोरेखित होणे
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी, संचारबंदी यांसारखे मार्ग अवलंबण्याऐवजी संयमाने तोडगा काढणे आवश्यक आहे, अन्यथा सामान्य जनतेचा उपासमारीने जीव जाईल; म्हणून संक्रमणाची साखळी तोडतांना ‘अर्थचक्र गतीमान राहील’, असा मार्ग शोधावा लागेल. हा मार्ग म्हणजे हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे आणि उपासनेला प्राधान्य देणे, हाच आहे. हिंदु धर्माप्रमाणे नमस्कार केल्यास सुरक्षित अंतर ठेवून समोरच्याला मान देता येतो. यातून कोरोनाची साखळीही निर्माण होत नाही, हे पाश्चात्त्य विद्वानांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तसे आचरण चालू केले आहे. या लहानशा सूत्रावरून ‘हिंदु धर्मातील लहानसा आचारही मानवाला सुरक्षा देऊ शकतो’, हे अधोरेखित होते; म्हणून येथील शासनकर्त्यांनी समाजाला हिंदु धर्म, साधना शिकवली, तर अशा महामारीवर सहज मात करता येऊ शकते, हे लक्षात घ्यावे.
६. कोरोनारूपी राक्षसाचा नायनाट करण्यासाठी धर्माचरण आणि साधनेचे बळ हाच रामबाण उपाय आहे !
कोरोना हे चीनचे जैविक अस्त्र आहे, असे म्हटले जात आहे. विश्वावर राज्य करण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेतून उत्पन्न झालेल्या कोरोनारूपी राक्षसाचा नायनाट करण्यासाठी धर्माचरण आणि साधनेचे बळ हाच रामबाण उपाय आहे. धर्माचरण आणि साधनेमुळे वातावरणातील चैतन्यशक्ती वाढून तमोगुणी कोरोनाचा नाश होऊ शकतो. देवळे बंद ठेवून चैतन्यशक्ती वाढणार नाही. देवस्थानांमधील नित्यपूजा, होमहवन आदींमध्ये खंड पडू नये, याची काळजी शासनकर्ते आणि हिंदु बांधव यांनी घेतली पाहिजे.
७. सर्वच शासनकर्त्यांनी स्वतःपासून धर्माचरणास आरंभ करून समाजालाही धर्माचरणी बनवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि देवळामध्ये जाऊन भक्तीभावाने परमेश्वराला शरण जाऊन या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करावी !
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याची सूचना केली आहे. प्रजेकडून मात्र त्याचे पालन होत नाही. याचे कारण शासनकर्त्यांनी समाजाला धर्माचरण शिकवले नाही, हेच आहे. प्रजा धर्माचरणी असती, तर आज टाळेबंदीसारख्या तोडग्याची आवश्यकताच भासली नसती; म्हणून सर्वच शासनकर्त्यांनी स्वतःपासून धर्माचरणास आरंभ करून समाजालाही धर्माचरणी बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. देवळामध्ये जाऊन भक्तीभावाने परमेश्वराला शरण जाऊन या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करावी. मद्यपानाला मोकळीक देऊन प्रजेला व्यसनाधीन बनवून अर्थव्यवस्था सुधारणार नाही. तसेच भक्तांच्या भक्तीत खंड पाडून कोरोनावर मात करता येणार नाही, हे सत्य समजून घ्यावे.
८. त्रेतायुगात रावणाने देवतांना बंदी बनवणे, मायावी राक्षसांनी ऋषिमुनींचा छळ केल्याने त्यांनी भगवंताला प्रार्थना करणे
त्रेतायुगात रावणाने देवतांना बंदी बनवले होते. रावणाच्या आदेशावरून मायावी राक्षसांनी ऋषिमुनींचा छळ केला. त्यांच्या यज्ञांचा विध्वंस केला आणि साधनेत खंड पाडला. शेवटी ऋषिमुनींनी भगवंताला प्रार्थना केली. ऋषिमुनींची सहस्रो वर्षांची साधना होती. त्यामुळे भगवंत त्यांच्या हाकेला लगेच धावून आला. आपणही असे भक्त होणे आवश्यक आहे. आताही तसाच काळ उद्भवला आहे. या काळात साधना वाढवून भगवंताला शरण जाऊया.
९. हे परमेश्वरा, सर्व देशवासीय, हिंदु बांधव आणि सर्व संप्रदायांचे साधक यांनी आपापली कुलदेवता, इष्ट देवता आणि सद्गुरु यांना ‘मानवजातीवर मोठी संकटे आली असून या विनाशकाळात तूच रक्षण कर’, अशी कळकळीची प्रार्थना करावी !
सर्व देशवासीय, हिंदु बांधव आणि सर्व संप्रदायांचे साधक यांना माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी आपापली कुलदेवता, इष्ट देवता आणि सद्गुरु यांना सतत प्रार्थना करावी. ‘हे परमेश्वरा, मानवजातीवर मोठे संकटे आले आहे. तुझी देवळे बंद केली जात आहेत. तुझे नित्य पूजन आणि वार्षिक उत्सव यांमध्ये खंड पाडला जात आहे. ही स्थिती म्हणजे घोर विनाशकाळाचाच आरंभ आहे. या विनाशकाळात तूच आमचे रक्षण कर.
१०. घोर विनाशकाळात भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप करण्यावर सर्वांनी भर द्यावा !
घोर विनाशकाळात भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप करण्यावर सर्वांनी भर द्यावा. साक्षात् महादेवाने रामनामाने हलाहल विष पचवले. रामनामाने दगड पाण्यावर तरले. रामनामाच्या जोरावर मारुतिरायांनी अतुलित कार्य केले अन् चिरंजीव झाले. हा नामाचा महिमा आहे. भगवंताचा नामजप केल्यास ‘आपण या भीषण आपत्काळात तरून जाऊ’, याची निश्चिती बाळगा. नामजपाच्या जोडीला मारुतिरायांसारखी दास्यभक्ती वाढवणे आवश्यक आहे.
११. कोरोनासारखे रोग हे पंचमहाभूतांमधून उत्पन्न होऊन वायूमंडलातून पसरत असून यासाठी ‘पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते’, अशा चिरंजिवी हनुमंताची उपासना करण्याविना दुसरा तरणोपाय नसणे
कोरोनारूपी महामारी शरिरावर जितका आघात करते, त्यापेक्षा अधिक मनावर आघात करत आहे. दैनंदिन बातम्या, सामाजिक संकेतस्थळावरील संदेश आदींमुळेे या महामारीविषयी मनात भय निर्माण झाले आहे. मनावर बसलेले हे भूत काढून टाका आणि महारुद्र हनुमंताची उपासना करा. हनुमान हा भगवान शंकराचा ११ वा रुद्र आहे. म्हणूनच तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे. कोरोनासारखे रोग हे पंचमहाभूतांमधून उत्पन्न होऊन विशेषतः वायूमंडलातून पसरत आहेत. यासाठी ‘पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते, अशा चिरंजिवी हनुमंताची उपासना करण्याविना दुसरा तरणोपाय नाही’, हे लक्षात घेऊन हिंदु बांधवांनी संकटमोचक मारुतिरायांची उपासना वाढवावी.
१२. ‘मारुतिरायांसारखा दास्यभाव ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली सेवा करावी’, ही सर्व साधकांना कळकळीची विनंती असून हाच आपत्काळातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे !
साधकांनी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना करावी. परब्रह्मरूपी, सच्चिदानंदरूपी परात्पर गुरुदेवांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधना करण्यास सांगितले आहे. तेच श्रीराम आहेत आणि त्यांच्यात हनुमंत तत्त्वही आहे. ते अविनाशी परब्रह्म आहेत. साधकांचे रक्षण आणि धर्मसंस्थापना यांसाठीच त्यांनी अवतार धारण केला आहे. त्यामुळे साधकांनी कोरोनासारख्या महामारीची काळजी करण्याचे सोडून परात्पर गुरुदेवांना शरण यावे. आपले रक्षण करण्यासाठीच त्यांनी अवतार धारण केला आहे. मारुतिरायांसारखा दास्यभाव ठेवून त्यांनी सांगितलेली सेवा करावी, ही सर्व साधकांना कळकळीची विनंती आहे. हाच आपत्काळातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.’
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२१)