कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, त्यासाठी कार्यवाही आराखडा सज्ज ठेवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
सांगली, २२ एप्रिल – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यशासन निर्बंध अधिक कडक करणार आहे. राज्यशासन लागू करत असलेल्या निर्बंधाची कार्यवाही १०० टक्के कडकपणे करून दिलेल्या सूचनांचे ततोतंत पालन करा, त्यासाठी कार्यवाही आराखडा सज्ज ठेवा, अशा सूचना गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनास दिल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा-सुव्यवस्था, तसेच अन्य कामकाजाचा आढावा शंभूराज देसाई यांनी घेतला. त्या वेळी या सूचना त्यांनी दिल्या.
गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई पुढे म्हणाले, केंद्रशासनाने १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी होऊ नये याविषयीची सिद्धता पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी. रात्रीच्या बंदोबस्तासाठी महिला कर्मचार्यांना नेमण्यात येऊ नये, त्याचसमवेत ५० वर्षांवरील पोलिसांना बंदोबस्त न देता कार्यालयीन काम, पोलीस ठाण्यातील काम या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी.