मी देशासाठी लढतो; मात्र माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीत ! – सैनिकाची खंत
रिवा (मध्यप्रदेश) येथे सैनिकाला कोरोनाबाधित पत्नीवर उपचारासाठी करावी लागली वणवण !
रिवा (मध्यप्रदेश) – येथे सीमा सुरक्षा दलातील एका सैनिकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित सैनिक प्रयत्न करत आहे; मात्र एकाही रुग्णालयात खाट उपलब्ध नसल्याने संबंधित त्याला बराच त्रास सहन करावा लागला. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्याने हा सैनिक ४ दिवसांपूर्वी घरी परतला. त्याआधी तो त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होता.
या व्हिडिओमध्ये हा सैनिक सांगतो, ‘मागील ८ घंट्यांपासून माझी वणवण चालू आहे; मात्र मला कुणीही कुठल्या रुग्णालयात भरती करावे, याची माहिती देत नाही. याविषयी प्रसारमाध्यमांकडे मी व्यथा मांडल्यावर त्यांनी साहाय्य केल्यावर माझ्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले.’ त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी देशासाठी लढतो; मात्र माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीत.