दमोह (मध्यप्रदेश) येथे कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी चोरून नेले ऑक्सिजन सिलिंडर !

आज ऑक्सिजनसाठी चोर्‍या करणार्‍या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्‍चर्य वाटू नये !

नवी देहली – देशातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांना देण्यासाठीचा आक्सिजनचा साठा संपलेला असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास प्रारंभ केला आहे. या स्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाइकांवर आता चक्क ऑक्सिजन सिलिंडर चोरण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशातील दमोह येथे अशीच घटना घडली आहे.

नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडर चोरून घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार २० एप्रिलच्या रात्री ऑक्सिजन सिलिंडरने भरलेली एक गाडी रुग्णालयाजवळ आली होती. त्याच वेळी रुग्णालयात उपचार चालू असणार्‍या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी एक-एक करून सिलिंडर चोरून नेले. डॉक्टर्स आणि रुग्णालय प्रशासन यांनी नातेवाइकांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते काहीही ऐकून घेण्यास सिद्ध नव्हते. रुग्णांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याशी अयोग्य वर्तनही केले.