अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
|
मुंबई – ही घटना धक्कादायक आणि मन हेलावणारी आहे. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाइकांचे दु:ख मोठे आहे. या दुर्घटनेला उत्तरदायी असणार्यांची गय केली जाणार नाही. केवळ शोक-सांत्वन करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. झाकिर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेविषयी शोकसंदेश देतांना उद्धव ठाकरे यांनी वरील आवाहन केले. दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला असून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्यही घोषित केले आहे.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. ऑक्सिजनच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करत आहोत. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये. हे कसे घडले ते तातडीने पडताळून दायित्व निश्चित करावे. या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये. हा संपूर्ण महाराष्ट्रावरील आघात आहे. संपूर्ण महाराष्ट्र यात शोकमग्न आहे.’’