ईश्वर हा ‘काळ’ असल्याने त्याच्याशी एकरूप झालेल्या संतांचे वागणे काळानुसार असते !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेले अमृतवचन
‘एखाद्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने नुकतीच साधना करण्यास आरंभ केला, तर त्याला लगेच त्याच्या व्यसनाविषयी सांगणे योग्य नाही. ‘संतांना केव्हा काय करायचे ?’, हे ज्ञात असते; कारण त्यांना काळ कळतो. त्यामुळे वेळ आली की, ते त्या व्यक्तीला तसे सांगतात. तो त्यांच्याकडून झालेला एक उपदेशच असतो. वेळ आली की, आपोआपच त्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सुटते. दारूचे व्यसन कायमचे सुटण्यासाठी ‘साधना करणे’, हा एकमेव पर्याय आहे; कारण पूर्वजांच्या त्रासामुळे मनुष्य व्यसनाधीन होतो. संपत्काळात ‘वेळ आली की, मग सांगू’, हे ठीक आहे; परंतु आपत्काळात मात्र असे नसते. आपत्काळात वेळच नसल्याने लगेचच एखाद्याला साधना सांगून त्याला त्याच्या व्यसनाचीही जाणीव त्वरित करून द्यावी लागते.
यामध्ये आणखी एक पैलू असाही आहे की, सध्या आपत्काळाची तीव्रता पहाता काळाला जाणून ‘वेळ साधणे’ अधिक महत्त्वाचे आहे. ‘समोर आलेली व्यक्ती आयुष्यात पुन्हा केव्हा भेटेल ?’, हे ईश्वरालाच ठाऊक असते. त्यामुळे समष्टी संत ‘आता आलेली वेळच समोरच्या व्यक्तीसाठीचा योग्य काळ आहे’, हे जाणून क्षणाचाही विलंब न करता तिच्या व्यसनाविषयी तिला सांगतात. साधनेला पोषक विचारांचे बीज व्यक्तीच्या मनामध्ये पेरले गेले, तर आज न उद्या त्याचा सुंदर असा साधनेचा वृक्ष फुलणारच आहे. आता योग्य वेळ येण्याची वाट पहाण्याची वेळ नाही. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. वर्तमानात मिळालेली संधी हीच देवाने दिलेली योग्य वेळ समजून पुढे जावे. आता आपत्काळात संतांनी सांगितलेल्या सर्वच गोष्टींचे पालन करून साधनेला त्वरित आरंभ करावा.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२८.४.२०२०)