रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात सेवा करतांना सौ. सायली करंदीकर यांना आलेल्या अनुभूती

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. साधकांसाठी बनवायच्या पदार्थामध्ये अधिक तिखट घातले जाऊनही पदार्थ तिखट न होणे

‘काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमात सर्व साधकांसाठी एक पदार्थ बनवण्याच्या सेवेचे दायित्व माझ्याकडे होते. ‘आश्रमातील साधकसंख्येनुसार तो पदार्थ किती प्रमाणात करायचा ?’, हे ठरवून त्याला लागणार्‍या साहित्यांचे तीन भाग केले होते. ते तीन भाग टप्प्याटप्प्याने सिद्ध करायचे होते. पहिला भाग अधिक असल्यामुळे त्यामध्ये अधिक तिखट घातले होते. दुसरा भाग थोडा अल्प असल्याने त्यामध्ये आधीपेक्षा अल्प प्रमाणात तिखट घालणे अपेक्षित होते. त्यात ‘तिखटाचे प्रमाण किती असावे ?’, हे मी एका साधिकेला सांगितले होते. सहसाधिकेने ‘मी सांगितलेले योग्य ऐकले आहे का ?’, याची मी खात्री केली नव्हती. तिने त्यामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक तिखट घातले. पदार्थाकडे पाहून ‘यात अधिक तिखट घातले गेले आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्या पदार्थाची चव मी सहसाधिकेला दाखवली. त्यावर ती चव योग्य असल्याचे तिने सांगितले. ‘तिखट अधिक होऊनही तो पदार्थ तिला तिखट लागला नाही’, याचे मला आश्‍चर्य वाटले. त्या वेळी ‘देव आपल्याला किती साहाय्य करतो ?’, याविषयी कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.

सौ. सायली करंदीकर

२. सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचे आध्यात्मिक सामर्थ्य

​त्यानंतर साधारण दीड घंट्यांने मी बाबांना (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना) न्याहारी देण्यासाठी खोलीत गेले. त्या वेळी सद्गुरु बाबा आणि माझ्यामध्ये झालेले संभाषण अन् त्यातून मला जाणवलेले त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य पुढे दिले आहे.

सद्गुरु बाबा : तुला काही कृतज्ञताभाव वाटला का ?

मी : त्या वेळी मी पुष्कळ घाईत होते. त्यामुळे माझे मनाकडे लक्षच नव्हते.

सद्गुरु बाबा : नीट आठव काहीतरी प्रसंग घडला असणारच.

मी : का हो ? तुम्ही मला असे का विचारत आहात ?

सद्गुरु बाबा : सकाळी ७.१५ ते ७.३० या वेळेत मी एक भाववृद्धीसाठी प्रयोग केला. त्यामध्ये भगवान महाविष्णु क्षीरसागरात पहुडले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांच्या चरणांशी बसली आहे. त्या वेळी माझी भावजागृती होऊन मला कृतज्ञता वाटत होती. ‘ही कृतज्ञता तुलाही जाणवू दे’, यासाठी मी प्रार्थना केली होती.

​तेव्हा मला आठवले ७.१५ ते ७.३० याच वेळेत साधकांसाठी बनवलेल्या पदार्थामध्ये तिखट अधिक होऊनही ते तिखट झाले नसल्याविषयी मला कृतज्ञता वाटली होती. हे मी बाबांना सांगितल्यावर बाबा म्हणाले, ‘‘देव आपल्याला किती साहाय्य करत असतो, याची प्रचीती देवानेच दिली.’’

३. ही अनुभूती मी आईला (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) सांगितली. त्यावर ती म्हणाली, ‘‘किती सुंदर अनुभूती आहे. पदार्थामध्ये झालेले अधिक तिखट विष्णूच्या क्षीरसागराने खेचून घेतल्याने तुम्हाला तो पदार्थ तिखट लागला नाही.’

​या अनुभूतीतून ‘आपण चुकतो, तरी भगवंत आपल्या पाठीशी उभा रहातो. आपल्या चुकीला क्षमा करून समष्टीची हानी होऊ देत नाही आणि सद्गुरु बाबा करत असलेल्या भावप्रयोगात त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य किती आहे ?’, हे देवाने मला दाखवून दिले. यासाठी सद्गुरु बाबांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सायली करंदीकर (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची कन्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१६.११.२०२०)